युक्रेनच्या लष्कराची जबरदस्त हानी झालेली आहे

- रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा दावा

न्यूयॉर्क – रशियाबरोबरील युद्धात युक्रेनच्या लष्कराला जबरदस्त हानी सोसावी लागत आहे. म्हणूनच अवघ्या तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन तरुणांना रशियन सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्याची वेळ युक्रेनवर आली आहे. आम्ही रशियाबरोबरील युद्ध जिंकू शकतो, असे आश्वासन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्यांना दिले होते. त्यामुळे हे युद्ध त्यांच्या प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे. त्यासाठी हजारो युक्रेनींचा बळी जात असून युक्रेनसाठी ही अत्यंत भयावह परिस्थिती बनलेली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघातील रशियाचे उपराजदूत दिमित्री पोलान्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या लष्कराची जबरदस्त हानी झालेली आहे - रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा दावाअमेरिकन पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत उपराजदूत पोलान्स्की यांनी सध्याच्या काळात युक्रेनच्या लष्कराची अवस्था दयनीय बनल्याचा दावा केला. युक्रेनची पिछेहाट सुरू झाली असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आपणच मारलेल्या बढायांच्या सापळ्यात अडकले आहेत. आपला देश रशियाचा पराभव करू शकतो, असे आश्वासन झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्यांना दिले खरे. पण याची जबर किंमत युक्रेनची जनता मोजत आहे. अवघ्या तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन तरुणांना युद्धात पाठविण्याची वेळ युक्रेनवर आलेली आहे. या युद्धात युक्रेनच्या लष्कराला रसद व इतर गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या आर्चोमोव्‌‍स्क या महत्त्वपूर्ण प्रांताचा आजूबाजूचा भाग रशियन लष्कराशी संलग्न असलेल्या वॅग्नर ग्रूपने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे युक्रेनचे जवान इथे रशियाच्या वेढ्यात अडकले असून ही युक्रेनी लष्करासाठी अत्यंत गंभीर बाब ठरते, असा इशारा पोलान्स्की यांनी दिला.

याआधीही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे पाश्चिमात्यांच्या हातातले बाहुले असल्याचे सांगून त्यांच्यामुळेच हे युद्ध सुरू झाल्याचा आरोप रशियाने केला होता. तसेच पाश्चिमात्य माध्यमे या युद्धात युक्रेनची सरशी होत असल्याचे अवास्तव दावे करीत असल्याचे सांगून हा प्रचारयुद्धाचा भाग असल्याचे रशियाने म्हटले होते. पण युक्रेनच्या युद्धाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली असून युक्रेनच्या लष्कराला या युद्धात फार मोठी हानी सोसावी लागत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिका व नाटोने पुरविलेली शस्त्रास्त्रे देखील युक्रेनच्या लष्कराचा बचाव करू शकलेली नाहीत. म्हणूनच अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांनी आपल्याला लढाऊ विमाने पुरवावी, अशी मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असे संकेत अमेरिका व नाटोने दिले आहेत. त्याचवेळी अमेरिकी माध्यमे या युद्धात युक्रेनची अवस्था बिकट बनल्याचे मान्य करीत आहे. मात्र अशा परिस्थितीत हे युद्ध थांबविण्याच्या ऐवजी अमेरिका व नाटोने युक्रेनला अधिक लष्करी सहाय्य पुरवावे, अशी मागणी अमेरिकेतील कडवे रशियाविरोधक करीत आहेत.

हिंदी

 

leave a reply