रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनी लष्कराची पुरवठा साखळी लक्ष्य

- रशियाच्या संरक्षण विभागाची माहिती

लष्कराची पुरवठा साखळीमॉस्को/किव्ह – युक्रेनने रशियन तळांवर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यांना रशियाने काही तासातच चोख प्रत्युत्तर दिले. सोमवारी रशियाने राजधानी किव्हसह अनेक प्रांतांवर क्षेपणास्त्रांचा घणाघाती मारा केला. या माऱ्यात युक्रेनी लष्कराच्या पुरवठा साखळीचा भाग असणाऱ्या जागा व सुविधा लक्ष्य केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. गेल्या दोन महिन्यात रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्याची ही आठवी वेळ ठरते.

सोमवारी पहाटे युक्रेनने रशियाच्या एन्गेल्स व रायझान या दोन तळांवर ड्रोन हल्ले चढविले होते. युक्रेनच्या या हल्ल्यांमध्ये पाच जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याला रशियाने अवघ्या काही तासातच जोरदार प्रत्युत्तर दिले. रशियाच्या संरक्षणदलांनी राजधानी किव्हसह विनित्सा, ओडेसा, सुमी, चेर्कासी, खार्किव्ह, क्रिव्हयि रिह, किरोवोग्रॅड, मायकोलेव्ह, झायटोमिर व डिनिप्रोपेट्रोव्हस्क भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियन नौदल तसेच बॉम्बर्सच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात आले. यावेळी जवळपास 70 क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. रशियन फौजांनी 17 लक्ष्ये निर्धारित केली होती व या सर्व लक्ष्यांवर हल्ले यशस्वी झाले, अशी माहिती रशियायच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

रशियाच्या या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर राजधानी किव्हसह अनेक भागांमधील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला आहे. अनेक शहरांमध्ये पुन्हा दीर्घकाळासाठी ब्लॅकआऊट लागू करण्यात येत असल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही भागांमध्ये पाणीपुरवठाही बंद झाल्याचा दावा स्थानिक यंत्रणांनी केला. रशियाने केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यातील काही क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचेही युक्रेनी लष्कराने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशिया ‘डमी मिसाईल्स’ वापरत असल्याचा दावा केला होता.

ऑक्टोबर महिन्यात रशियाने युक्रेनविरोधात क्षेपणास्त्र हल्ल्यांचे मोठे सत्र सुरू केले होते. ही मोहीम सुरू झाल्यावर रशियाकडील क्षेपणास्त्रांचे साठे संपत चालल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हे दावे व बातम्या खोट्या पाडून रशियाने गेल्या दोन महिन्यात तब्बल आठ वेळा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. यातून रशियाने आपली लष्करी क्षमता दाखवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे समर्थन केले होते.

युक्रेनने क्रिमिआतील ब्रिजवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे रशियाला युक्रेनमधील पायाभूत सुविधा व इतर भागांवर क्षेपणास्त्र हल्ले करावे लागत आहेत. पुढील काळातही हे हल्ले सुरू राहतील, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियाच्या नव्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर युक्रेनला ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ देण्यास प्राधान्य दिले जाईल, असे वक्तव्य अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केले आहे.

English

leave a reply