केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नॅशनल क्वांटम मिशन’च्या स्थापनेचा क्रांतिकारी निर्णय

नवी दिल्ली – ‘नॅशनल क्वांटम मिशन’च्या स्थापनेचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून यासाठी सहा हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. क्वाटंम तंत्रज्ञान हे भविष्यात जीवनाच्या जवळपास प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकणारे ठरेल, असे दावे केले जातात. आजवर केवळ सहा देशांना या आघाडीवर थोडीफार प्रगती करून दाखविणे शक्य झालेले आहे. त्यामुळे भारताने क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भात घेतलेला निर्णय क्रांतिकारी ठरेल आणि ही भारताने घेतलेली ‘क्वांटम जंप’ ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केला.

Cabinet briefingअमेरिका, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड आणि चीन या देशांनी क्वांटम क्षेत्रात संशोधन केलेले आहे. पण यापैकी बरेचसे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत भारताने क्वाटंम तंत्रज्ञानाच्या संदर्भात घेतलेला निर्णय क्रांतिकारी ठरेल. पुढच्या काळात यामुळे देशाची स्थितीगती पालटू शकेल. कारण क्वाटंम तंत्रज्ञानाचा वापर संरक्षणापासून ते आरोग्यक्षेत्रापर्यंत केला जाईल. यामुळे सुरक्षित संपर्कव्यवस्था प्रस्थापित करण्यापासून ते वैद्यकिय उपचारांपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होतील, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. तसेच या तंत्रज्ञानाचे क्षेत्र पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला चालना देईल, असा विश्वास जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला.

आजवर भारत तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगत देशांच्या मागे होता. इतर देशांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारताने काम केले. त्यामुळे भारत आत्तापर्यंत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ‘फॉलोअर’ होता. पणक्वाटंम तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारत ‘लिडर’ अर्थात नेतृत्त्व करणारा देश बनेल, असा दावा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. २०२३-२४ ते २०३०-३१ या आठ वर्षांच्या कालावधीत काँटम तंत्रज्ञानावर संशोधनासाठी सुमारे ६००३.६५ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

क्वाटंम क्षेत्रातील संशोधनावर टप्प्या टप्प्याने ही रक्कम खर्च करण्यात येईल, असे जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. त्याचवेळी क्वांटम तंत्रज्ञानाचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता, सुरक्षित, वेगवान, विश्वासार्ह संवाद व संपर्कासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरेल, असे जितेंद्र सिंग पुढे म्हणाले. इतकेच नाही तर क्वांटम तंत्रज्ञान विकसित केलेले देश एकमेकांच्या संवाद व संपर्कव्यवस्थेत हस्तक्षेप करू शकणार नाहीत, असा दावा सिंग यांनी केला आहे.

नॅशनल क्वांटम मिशन सहा मंत्रालयांशी जोडले जाणार असून त्यांच्याशी सहकार्याने याचे कार्य केले जाईल, अशी माहितीही सिंग यांनी दिली. तसेच नॅशनल क्वांटम मिशनचे अध्यक्षपद मान्यताप्राप्त संशोधक किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांना दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

leave a reply