भारत व ब्रिटनचे दहशतवादाविरोधात एकमत

नवी दिल्ली – सर्वच प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारून दहशतवाद खपवून न घेण्यावर भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांचे एकमत झाले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीत दहशतवादाच्या विरोधात स्वीकारण्यात आलेली ही ठाम भूमिका हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरले. दहशतवादाच्या विरोधात भारत व ब्रिटनच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यावरही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची सहमती झाली आहे.

भारताच्या विरोधात दहशतवाद तसेच अतिरेक खपवून न घेण्याबाबत ब्रिटनची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. यावर ब्रिटनमध्ये सहमती आहे, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील चर्चेनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. यासाठी भारताबरोबर दहशतवाद तसेच कट्टरवादाच्या विरोधात ब्रिटन टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली. याचा लाभ भारताला मिळेल, असा विश्वास ब्रिटनच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दहशतवादच नाही, तर दहशतवाद्यांना वेगवेगळ्या मार्गाने सहाय्य तसेच प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आणि दहशतवाद्यांची अभयारण्ये या सर्वांच्या विरोधात भारत व ब्रिटन ठाम भूमिका स्वीकारणार असल्याचा दावा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तसेच पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदी व पंतप्रधान जॉन्सन यांच्या संयुक्त निवेदनात कडक शब्दात निषेध करण्यात आला होता.

हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांना दिलेला इशारा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याबरोबरच भारत हा हुकूमशाहीवादी देशांपेक्षा खूपच वेगळा देश असून भारतात प्रत्येकाला संविधानाद्वारे संरक्षण पुरविले जाते, याचा उल्लेख करून पंतप्रधान जॉन्सन यांनी महान लोकशाहीवादी देश असा भारताचा गौरव केला आहे.

leave a reply