‘खोरासन’वरच्या हल्ल्यासाठी अमेरिकेने तालिबानची परवानगी घ्यायला हवी होती

- तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद

काबुल – गेल्या आठवड्यात काबुल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटात 190 हून अधिक जणांचा बळी गेला होता. अमेरिकेने ड्रोन हल्ला चढवून काबुल विमानतळाजवळ स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस-खोरासन’च्या प्लॅनरला ठार केले. अमेरिकेच्या या कारवाईवर तालिबानने आक्षेप घेतला. ‘अमेरिकेची ही कारवाई म्हणजे अफगाणिस्तानवरील हल्ला ठरतो’, असा आरोप तालिबानने केला आहे. त्याचबरोबर या कारवाईआधी अमेरिकेने तालिबानची परवानगी घेणे आवश्‍यक होते, असे तालिबानने फटकारले आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील नांगरहार प्रांतात शनिवारी पहाटे ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात ‘आयएस-खोरासन’चे दोन दहशतवादी ठार झाले. गुरुवारी काबुल विमानतळाजवळ स्फोटाची योजना आणखारा दहशतवाद्याचा यात समावेश असल्याचे अमेरिकेने जाहीर केले. या कारवाईत एक दहशतवादी जखमी झाल्याचे पेंटॅगॉनने सांगितले. कतारमधील आपल्या लष्करी तळावरुन हा हल्ला चढविल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

पण ‘आयएस-खोरासन’वरील या कारवाईवर तालिबानने टीका केली. अमेरिकेने या कारवाईची माहिती आपल्याला द्यायला हवी होती, असे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने सांगितले. त्याचबरोबर अमेरिकेच्या या ड्रोनहल्ल्यात दोन महिला आणि एक मुल जखमी झाल्याचा आरोप मुजाहिदने केला.

अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून तालिबान अमेरिकेच्या हल्ल्यावर आक्षेप घेत आहे. पण काबुलच्या विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणे तालिबानला शक्य होईल का? असा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला जात आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तानात प्रशासन चालविण्याची क्षमता तालिबानकडे नाही, असा संशयही व्यक्त केला जात आहे. कारण वरकरणी तालिबान आपला उदार चेहरा जगासमोर पेश करीत अली तरी तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या इतर भागात भयंकर अत्याचार करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

काही तासांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका लोककलाकाराची निघृण हत्या घडविली. या हत्येच्या आधी तालिबानी दहशतवाद्यांनी या लोककलाकारासोबत चहापान केले व गप्पा देखील मारल्या होत्या. त्यानंतर अत्यंत थंडपणे या लोककलाकाराची हत्या घडवूून तालिबानने आपल्याला मानवी जीवनाबद्दल आदर नसल्याचे दाखवून दिले. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तालिबानच्या विरोधात तीव्र असंतोष दाटून आला आहे.

अफगाणिस्तानातील हजारा आणि ताजिक या अल्पसंख्यांकांना तालिबानचे दहशतवादी धमकावत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. नेतृत्वाकडून आदेश मिळताच देशातील अल्पसंख्यांकांची कत्तल केली जाईल, असे तालिबानचा दहशतवादी हजारा समुदायाला सांगताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशारितीने तालिबानचा खरा चेहरा समोर येत असतानाही, अमेरिका तालिबानविरोधात का कारवाई करीत नाही, असा प्रश्‍न स्थानिक अफगाणी करीत आहेत.

मात्र काबुल विमानतळावरील घातपातामागे तालिबान नसून खोरासान आहे, असे जाहीर करणाऱ्या अमेरिकेने खोरासानवरील कारवाईकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. तालिबान व खोरासान एकच असल्याच्या आरोपांकडे बायडेन प्रशासन कानाडोळा करीत आहे. तालिबानमधलाच अत्यंत महत्त्वाचा गट असलेल्या हक्कानी नेटवर्कचा तालिबानशी संबंध नसल्याचा दावा व्हाईट हाऊसचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी नुकताच केला होता. यामुळे दहशतवादी कारवायांसाठी थेट तालिबानचा वापर न करता, इतर दहशतवादी संघटनांचे मुखवटे वापरण्याचे कारस्थान यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे.

या कारस्थानामागे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय असल्याचा आरोप अर्मेनियाच्या एका अभ्यासगटाने केला होता. पण तालिबान तसेच आयएसआयच्या या डावपेचांकडे बायडेन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply