वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सारे सैन्य माघारी घेतल्याखेरीज या देशात शांतता प्रस्थापित होणार नाही, असे तालिबान ठासून सांगत आहे. आजवर तालिबानची पाठराखण करीत आलेल्या पाकिस्तानलाही अफगाणिस्तानातून नाटो व अमेरिकन लष्कराची माघार अपेक्षित होती. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील आपले सैन्य मायदेशी बोलाविण्याची तयारी केल्यानंतर पाकिस्तानची चलबिचल सुरू झाल्याचे दिसत आहे. द वाशिंग्टन पोस्ट या ख्यातनाम अमेरिकन वर्तमानपत्रात लेख लिहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेने घाईघाईने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणे, शहाणपणाचे ठरणार नाही, असा दावा केला. त्यांच्या या लेखानंतर पाकिस्तानचे विश्लेषक बुचकाळ्यात पडले आहेत.
२९ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि तालिबानमध्ये अफगाणिस्तानातील शांतीचर्चा व सैन्यमाघारीसंबंधी करार झाला होता. या शांतीचर्चेत अमेरिकने अफगाणिस्तानातून आपले सारे सैन्य माघारी घ्यावे, ही तालिबानची अट अमेरिकेने मान्य केली आणि त्यानंतर सदर चर्चा यशस्वी ठरल्याचे जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्यापूर्वीच अफगाणिस्तानातून टप्प्याटप्प्याने सैन्यमाघार घेण्याचे जाहीर केले होते. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून अमेरिकेच्या या सैन्यमाघारीची सुरुवात होणार असल्याचे संकेत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले होते.
पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकी वर्तमानपत्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिलेल्या लेखात इम्रान खान यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याची घाई करू नये, असे म्हटले आहे. अफगाणिस्तानातील सरकार आणि तालिबानमधील शांतीचर्चा यशस्वी ठरल्याशिवाय सैन्यमाघारीच्या वेळापत्रकाचे पालन करू नये, असे इम्रान यांनी सुचविले आहे. अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित झाली तरच पाकिस्तानातही खर्या अर्थाने शांती प्रस्थापित होईल, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला. त्याचबरोबर, शांतीप्रक्रियेत सहभागी नसलेले देश अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करीत असल्याची टीका करुन इम्रान यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर टीका केली.
अफगाणिस्तानचे कार्यकारी अधिकारी अब्दुल्लाह अब्दुल्लाह पाकिस्तानच्या भेटीवर असताना इम्रान खान यांचा हा लेख प्रसिद्ध झाला आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या प्रतिक्षेत असल्याचा आरोप अफगाणिस्तानचे लष्कर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याआधी केला होता. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबानच्या सहाय्याने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्याचा पाकिस्तानचा डाव होता. भारताकडून काश्मीर हस्तगत करण्याचा मार्ग अफगाणिस्तानातून जातो, असे सांगून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी तालिबानचा वापर करुन काश्मीर जिंकण्याची योजना मांडत होते. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेकडे केलेली ही मागणी चमत्कारीक असल्याचे खुद्द पाकिस्तानच्या काही पत्रकार व विश्लेषकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान भारताची भाषा का बोलू लागले आहेत, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्यासाठी लागणारा रसदीचा पुरवठा पाकिस्तानमार्गे केला जातो. त्यामुळे अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर अमेरिकेला पाकिस्तानवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. यामुळे पाकिस्तानचे महत्त्व पूर्णपणे संपून जाईल, ही बाब पाकिस्तानी धोरणकर्त्यांच्या लक्षात आली असावी. तसेच अफगाणिस्तान तालिबानच्या हाती पडल्यास अफगाणिस्तानात अराजक माजेल व त्याचे पडसाद पाकिस्तानातही उमटतील, या भीतीने पाकिस्तानला ग्रासल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तानात कट्टरवाद वाढीस लागेल आणि यामुळे पाकिस्तानातील कट्टरवाद्यांना अधिक बळ मिळेल, अशी भीती पाकिस्तानातील एका वर्गाला वाटू लागल्याचे दावे केले जातात. यामुळे आता पाकिस्तानला अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्य हवेहवेसे वाटू लागल्याचे संकेत मिळत आहेत.