इराणला रोखण्यासाठी अमेरिकेकडे समर्थ लष्करी पर्याय आहेत

- अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅक्केन्झी

जनरल मॅक्केन्झीवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने इराणबरोबर अणुकराराबाबत चर्चा सुरू केली असली तरी, इराणविरोधात लष्करी पर्यायाचा विचार सोडून दिला नसल्याचे संकेत अमेरिकेचे लष्कर देत आहे. ‘इराणचा आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेकडे अतिशय समर्थ लष्करी पर्याय उपलब्ध आहेत’, असा इशारा अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅक्केन्झी यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अधिकार्‍याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिका व इस्रायलची लढाऊ विमाने संयुक्त सराव करणार असल्याची माहिती दिली होती.

आखातातील अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख जनरल फ्रँक मॅक्केन्झी यांनी ब्रिटनमधील वृत्तपत्राशी बोलताना इराणबाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा राजकीय वाटाघाटींनी सोडविणे, हा अमेरिकेचा व्हिएन्ना चर्चेत सहभागी होण्याचा मुख्य हेतू आहे. राजकीय चर्चेचा हा मार्ग सर्वांसाठी योग्य असून इराणने देखील हे लक्षात घ्यायला हवे’, याची जाणीव जनरल मॅक्केन्झी यांनी करून दिली.

त्याचवेळी इराण अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करीत असल्याचा इशारा सेंटकॉमच्या प्रमुखांनी दिला. ‘इराक, सिरियातील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू ठेवून आपण अणुकराराबाबतच्या चर्चेतही सहभागी होऊ शकतो, असे जर इराणला वाटत असेल, तर इराण अमेरिकेला कमी लेखत आहे. कारण तशीच आवश्यकता निर्माण झाल्यास अमेरिका लष्करी कारवाईची क्षमता बाळगून आहे’, असे जनरल मॅक्केन्झी यांनी ठणकावले.

त्याचबरोबर इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून आखाताच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याची अमेरिकेला जाणीव असल्याचे मॅक्केन्झी म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी इस्रायल, सौदी अरेबिया, बाहरिन आणि इजिप्त या देशांच्या लढाऊ विमानांबरोबर या क्षेत्रातून संयुक्त गस्त घालून अमेरिकेने इराणला योग्य तो संदेश दिला होता, याची आठवण सेंटकॉमच्या प्रमुखांनी करून दिली.

जनरल मॅक्केन्झीव्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरार पुनर्जिवीत करण्यासाठी चर्चा सुरू झाल्यापासून आखाती क्षेत्रातील राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’च्या सदस्य देशांचा दौरा सुरू केला आहे. आखाती क्षेत्रातील इराणच्या वाढत्या प्रभावावर चर्चा करण्यासाठी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अरब मित्रदेशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेत असल्याचे सौदीच्या माध्यमांचे म्हणणे आहे.

तर इस्रायलने उघडपणे इराणच्या विरोधात भूमिका स्वीकारली आहे. इस्रायलचे नेते आपली ही भूमिका परखडपणे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासमोर मांडत आहेत. अमेरिकेचे बायडेन प्रशासनाला इराणबरोबर अणुकरार करायचा असला तरी त्यांनी इराणवरील निर्बंध अजिबात मागे घेऊ नये, अशी मागणी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केले.

leave a reply