म्यानमारच्या लष्कराने ११ जणांना जिवंत जाळले

- आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले

११ जणांनाबँकॉक – म्यानमारच्या लष्कराने डोन ताऊ गावातील ११ जणांना घरातून बाहेर खेचून जिवंत पेटवून दिल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरातून म्यानमारच्या जुंटा राजवटीवर संताप व्यक्त होत आहे. तर ही पहिली घटना नसून म्यानमारच्या वेगवेगळ्या भागात अशा घटना नियमितपणे घडत असल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने केला आहे. दरम्यान, अमेरिकेने मानवाधिकारांचे उल्लंघन करणार्‍या म्यानमार तसेच चीनवर निर्बंध जाहीर केले आहेत.

म्यानमारच्या सागाईंग प्रांतातील डोन ताऊ गावात घडलेल्या किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ व फोटोग्राफ्स गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल आहेत. यातील ११ गावकर्‍यांमध्ये काही मुलांचा देखील समावेश असल्याचे उघड झाले होते. आपल्याविरोधातील निदर्शकांचा आवाज दडपण्यासाठी जुंटा राजवटीने इतकी घृणास्पद पातळी गाठल्याची टीका होत आहे. अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाने म्यानमारच्या जुंटा राजवटीवर टीका केली.

११ जणांनाफेब्रुवारी महिन्यापासून म्यानमारचे लोकनियुक्त सरकार उलथून सत्ता हाती घेणार्‍या जुंटा राजवटीकडून मानवाधिकारांच्या उल्लंघनामध्ये भयावहरित्या वाढ होत आहे. ही अतिशय धोक्याची सूचना असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. डोन ताऊ गावातील घटना म्हणजे जुंटा राजवटीच्या क्रौर्याचे आणखी एक भयंकर उदाहरण असून याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरातून कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

पण सोशल मीडियाद्वारे जगासमोर आलेली म्यानमारमधील ही घटना एकमेव नसल्याचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या स्थानिक प्रवक्त्या मॅनी माऊंग यांनी सांगितले. जुंटा राजवटीने म्यानमारचा ताबा घेतल्यापासून अशा घटना नियमितपणे घडत आहेत. मात्र त्या कधी व्हिडिओ किंवा फोटोग्राफ्सच्या रुपाने समोर आल्या नव्हत्या. जनतेला जरब बसविण्यासाठी म्यानमारचे लष्कर अशा घृणास्पद कारवाया करीत असल्याची टीका मॅनी माऊंग यांनी केली.

म्यानमारची जुंटा राजवट आपल्यावरील हे आरोप फेटाळत आहे. पण गेल्या आठ महिन्यांपासून लष्कर म्यानमारच्या वेगवेगळ्या भागात मानवाधिकार पायदळी चिरडत ११ जणांनाअसल्याची उदाहरणे समोर आली होती. गेल्याच महिन्यात वायव्येकडील एका गावातील वस्त्या लष्कराने पेटवून दिल्या होत्या. तर त्याआधी जुंटा राजवटीविरोधात निदर्शन करणार्‍यांना आश्रय देणार्‍या गावांवर हवाई हल्ले चढविणे किंवा त्या घरांमधील तरुण-तरुणींना उचलून नेण्याच्या घटना समोर आल्या होत्या.

फेब्रुवारी महिन्यापासून जुंटा राजवटीने आपल्याविरोधातील निदर्शने चिरडण्यासाठी केलेल्या कारवाईत १,३०० हून अधिक जणांचा बळी गेला. तर दहा हजारांहून अधिक जणांना अटक झाली आहे. देशातील जुंटा राजवटीच्या या कारवायांचा निषेध करण्यासाठी म्यानमारमध्ये शुक्रवारी मूक संप पुकारला होता. त्याला म्यानमारच्या जनतेने मोठा प्रतिसाद दिला.

दरम्यान, लोकशाहीवादी सरकार उलथून म्यानमारचा ताबा घेणार्‍या आणि मानवाधिकारांचे राजरोसपणे उल्लंघन करणार्‍या जुंटा राजवटीवर व्यापारी बहिष्कार टाकला जात आहे. आग्नेय आशियाई देशांनी देखील जुंटा राजवटीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पण चीनने म्यानमारबरोबरचे व्यापारी सहकार्य कायम राखले असून रेअर अर्थ अर्थात दुर्मिळ खनिजांची खरेदी सुरू ठेवली आहे.

leave a reply