‘सीपीईसी’ विरोधात पाकिस्तानातील बलोच व सिंध बंडखोरांची एकजूट

कराची – पाकिस्तानातील चीनच्या हितसंबंधांवर तसेच ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’वर (सीपीईसी) हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानातील दोन बंडखोर संघटना एकत्र आल्या आहेत. ‘बलोच राजी अजोइ संगर’ आणि ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ या संघटनांनी ‘सीपीईसी’ला लक्ष्य करण्याची घोषणा केली आहे. असे झाले तर चीनच्या या अब्जावधी डॉलर्सच्या प्रकल्पाच्या सुरक्षेची किंमत वाढेल, अशी माहिती समोर येत आहे.

CPEC-Chinaगेल्या आठवड्यात बलोच बंडखोर संघटनेने सिंध बंडखोर संघटनेशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले होते. “चीनच्या विस्तारवादी आणि आक्रमक कारवायांमुळे सिंध आणि बलोचिस्तानला सारखेच नुकसान झाले आहे. ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या आड चीन सिंध आणि बलोचिस्तानला स्वत:च्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. बादीनपासून ग्वादर बंदरापर्यंतच्या सागरी किनारपट्टीचा चीनला ताबा घ्यायचा आहे’, असा आरोप बलोच संघटनेने केला होता.

सिंध आणि बलोचिस्तानमधील चीनच्या या विस्तारवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी जून महिन्यात कराचीतील शेअर बाजाराच्या इमारतीवर हल्ला चढविला होता. बलोच आणि सिंध बंडखोरांनी एकत्र येऊन ही कारवाई केली होती, अशी माहिती या संघटनेने दिली. त्याचबरोबर येत्या काळात बलोचिस्तान तसेच सिंध प्रांतातून जाणार्‍या चीनच्या या ’सीपीईसी’ प्रकल्पावर हल्ले चढविणार असल्याचा इशारा या संघटनेने दिला. बलोच संघटनेने दिलेल्या या इशार्‍यावर पाकिस्तानातील विश्लेषकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

CPEC-Chinaबलोच आणि सिंध संघटनेत झालेल्या या हातमिळवणीने चीनच्या या प्रकल्पाला फारसे नुकसान होणार नाही. तसेच चीन किंवा पाकिस्तान या करारातून माघारही घेणार नसल्याचा दावा एका विश्लेषकाने केला आहे. तर बलोच आणि सिंध संघटनेच्या हल्ल्यांमुळे किंवा हल्ल्याच्या शक्यतेमुळे चीन आणि पाकिस्तानला ’सीपीईसी’शी संबंधितांची सुरक्षा वाढवावी लागेल. याचा थेट परिणाम या प्रकल्पाच्या किंमतीवर होईल, असे दुसर्‍या एका विश्लेषकाचे म्हणणे आहे. असे झाल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच खोलात जाईल, असा इशारा काही पाकिस्तानी विश्लेषक देत आहेत.

leave a reply