‘मेड इन इंडिया’ राख्यांमुळे चीनला चार हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली – गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांवर चढविलेला भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून चिनी मालाला प्रचंड विरोध होत असून रक्षाबंधनाच्या निमिताने पुन्हा त्याचा प्रत्यय आला. भारतीयांकडून रक्षाबंधनासाठी स्वदेशी राख्यांना पसंती देण्यात आल्याने चीनला तब्बल चार हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे समोर येत आहे.

Made-in-India-Rakhi‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ ने (सीएआयटी) चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून यावर्षी राखीचा सण ‘हिंदुस्थानी राखी’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन १० जून रोजी केले होते. कॅटच्या आवाहनानंतर देशभरात एक कोटी राख्या तयार करण्यात आल्या. चीनमधून एकही राखी आयात करण्यात आली नाही. देशातच तयार करण्यात आलेल्या राख्यांची खरेदी करण्यात आली. भारतीयांनी देखील याच राख्यांना पसंती दिली.

देशात दर वर्षी सुमारे ५० कोटी राख्यांची विक्री करण्यात येते. सुमारे ६ हजार कोटी रुपये किंमतींची उलाढाल यातून होते. गेल्या कित्येक वर्षांपासून, चार हजार कोटी रुपयांच्या राख्या किंवा राख्या बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची चीनमधून आयात करण्यात येते. मात्र यावर्षी एक राखी सुद्धा आयात करण्यात आली नाही, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले. भारतीयांना चिनी माला शिवाय पर्याय नसल्याचे चीनकडून सांगण्यात येत होते. मात्र स्वदेशी राख्यांना पसंती देत भारतींयानी चीनला आर्थिक झटका दिला आहे.

दरम्यान शिक्षण मंत्रालयायाकडून आयआयटी, बीएचयू, जेएनयू, एनआयटीसह अन्य शैक्षणिक संस्था आणि चीनी संस्थामध्ये झालेल्या ५४ सामंजस्य करारांचा पुनर्विचार करण्यात येणार आहे.

leave a reply