४८ टक्के अमेरिकी नागरिकांच्या दाव्यानुसार बँकांमध्ये पैसा ठेवणे असुरक्षित बनले

- सर्वेक्षण अहवालातील माहिती

वॉशिंग्टन – बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांच्या सुरक्षेबाबत अमेरिकेतील जवळपास निम्म्या लोकसंख्येला काळजी भेडसावत आहे. ४८ टक्के अमेरिकी नागरिकांना बँकेत पैसा ठेवणे असुरक्षित वाटू लागले आहे. २००८ साली अमेरिकेवर लेहमन ब्रदर्सचे संकट कोसळले होते. त्यावेळी सर्वसामान्य अमेरिकन जनतेची जशी चिंता होती, अगदी तशीच परिस्थिती सध्याच्या अमेरिकन जनतेला सतावत आहे, असा दावा ‘गॅलप’ अमेरिकन सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सिलिकॉन वॅली बँक आणि सिग्नेचर्स बँकांवर कोसळलेल्या संकटानंतर अमेरिकन जनतेत ही भीती असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

४८ टक्के अमेरिकी नागरिकांच्या दाव्यानुसार बँकांमध्ये पैसा ठेवणे असुरक्षित बनले - सर्वेक्षण अहवालातील माहितीदोन दिवसांपूर्वीच ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ ही आणखी एक बँक दिवाळखोरीत निघाली. गेल्याच महिन्यात बँकेच्या ग्राहकांनी तब्बल १०० अब्ज डॉलर्स बँकेतून काढून घेतल्याची माहिती उघड झाली होती. ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ दिवाळखोर होणे हे अमेरिकी बँकिंगच्या इतिहासातील दुसरे सर्वात मोठे प्रकरण ठरले होते. या घटनेने अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमेरिकेसह जगातील आघाडीच्या वित्तसंस्थांपैकी एक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘जेपी मॉर्गन चेस’ने अमेरिकेतील ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ खरेदी केली. पण यामुळे अमेरिकन बँकांवरील संकटाची तीव्रता कमी झाली नसल्याचे आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

साधारण दोन महिन्यापूर्वी सिलिकॉन वॅली बँक, सिग्नेचर्स बँक तसेच क्रेडिट स्यूज्‌‍ यासारख्या मोठ्या वित्तसंस्था दिवाळखोरीत निघाल्या होत्या. अमेरिकेतील जवळपास २०० बँका अशाच दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचा दावा ‘सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क’ या अभ्यासगटाने केला होता. ही आकडेवारी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे अमेरिकेतील काही अर्थतज्ज्ञांनी म्हटले होते. ४८ टक्के अमेरिकी नागरिकांच्या दाव्यानुसार बँकांमध्ये पैसा ठेवणे असुरक्षित बनले - सर्वेक्षण अहवालातील माहितीपण लेहमन ब्रदर्सचे माजी उपाध्यक्ष लॉरेन्स मॅक्‌‍डोनाल्ड यांनी सदर माहितीत असलेले तथ्य नाकारता येणार नसल्याचे म्हटले होते. अमेरिकेतील किमान ५० बँका कोसळण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा मॅक्‌‍डोनाल्ड यांनी दिला होता.

गॅलप या अमेरिकेतील सर्वेक्षण कंपनीने ३ ते २५ एप्रिल या कालावधीत एक सर्वेक्षण घेतला होता. यानुसार १९ टक्के जणांनी बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांच्या सुरक्षेबाबत अतिशय काळजी वाटत असल्याचे मत नोंदविले. तर २९ टक्के जणांनी मर्यादित प्रमाणात चिंता वाटत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. तर थोडीफार चिंता असलेल्यांची संख्या ३० टक्के आणि २० टक्के जणांना काहीच चिंता नसल्याचे स्पष्ट केले. त्यातही अमेरिकेतील रिपब्लिकन समर्थकांप्रमाणे सत्ताधारी बायडेन यांच्या डेमोक्रॅट समर्थकांमध्ये देखील ही भीती असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हिंदी

 

leave a reply