जपानमधील नाटोच्या कार्यालयामुळे पूर्व आशियाई देशांमध्ये संघर्ष पेटेल

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बीजिंग – ‘आशिया-पॅसिफिक क्षेत्रात संघर्ष भडकविण्यासाठी नाटोचे सलग प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रातील कारभारात नाटोचा वाढता हस्तक्षेप येथील शांती आणि स्थैर्य धोक्यात आणणारे ठरेल आणि यामुळे संघर्ष देखील पेट घेईल’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. जपानमध्ये कार्यालय उघडण्याबाबत नाटो विचार करीत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्यावर चीनकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

जपानमधील नाटोच्या कार्यालयामुळे पूर्व आशियाई देशांमध्ये संघर्ष पेटेल - चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारायुक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाविरोधी युद्धात अमेरिका व नाटोला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मित्रदेशांनी मोठ्या प्रमाणात सहाय्य सुरू ठेवले आहे. युक्रेनला लष्करी तसेच आर्थिक सहाय्य पुरविण्याबरोबरच रशियावरील निर्बंधांमध्येही या देशांनी सहकार्य केले आहे. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या आघाडीच्या देशांचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील या मित्रदेशांच्या सहकार्यासाठी नाटो लवकरच जपानमध्ये कार्यालय सुरू करू शकते, असा दावा जपानमधील वर्तमानपत्राने केला होता.

काही दिवसांपूर्वी नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट झाल्याची आठवण या वर्तमानपत्राने करुन दिली. त्याबरोबर चीनमधून यावर आक्रमक प्रतिक्रिया आली आहे. ‘आशिया हा शांती आणि स्थैर्याचा नांगर आहे. सहकार्य आणि विकासाची हमी देणारी भूमी आहे. आशिया म्हणजे भूराजकीय स्पर्धेसाठी कुस्तीचे मैदान नाही’, अशी जळजळीत टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केली. त्याचबरोबर नाटो आशिया-पॅसिफिक क्षेत्रात संघर्ष भडकविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप निंग यांनी केला.

जपानमधील नाटोच्या कार्यालयामुळे पूर्व आशियाई देशांमध्ये संघर्ष पेटेल - चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशाराया क्षेत्रातील घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याच्या नाटोच्या प्रयत्नांमुळे येथील शांती आणि स्थैर्य धोक्यात येईल व संघर्ष पेटेल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. नाटोच्या कारवायाविरोधात क्षेत्रीय देशांनी पाळत वाढवावी, असे आवाहन निंग यांनी केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील हस्तक्षेप वाढवून नाटो तसेच अमेरिका या क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीनने याआधी केला होता.

जपानमध्ये कार्यालय सुरू करण्याबाबत नाटोने अधिकृत स्तरावर घोषणा केलेली नाही. पण भविष्यात याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे अमेरिका-नाटोचे सहकारी देश आहेत. या देशांच्या सुरक्षेला चीनकडून धोका असल्याचा दावा अमेरिका व नाटोने याआधी केला होता. तसेच या देशांच्या व या क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने जपान-दक्षिण कोरिया तसेच ऑस्ट्रेलियाबरोबर लष्करी सहकार्य वाढविले आहे. त्यामुळे येत्या काळात नाटो या क्षेत्रात आपले कार्यालय सुरू करण्याची शक्यता असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

दरम्यान, येत्या काही दिवसात जपानमध्ये जी७ची बैठक पार पडणार आहे. यामध्ये जपान चीनपासून असलेल्या धोक्याचा उल्लेख करू शकतो.

हिंदी English

 

leave a reply