रिपर ड्रोनच्या युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनची अमेरिकेला धमकी

कॅलिफोर्निया/बीजिंग – पूर्व पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेच्या संरक्षणदलाने सुरू केलेल्या युद्धसरावावर चीनने संताप व्यक्त केला. या युद्धसरावात अमेरिकन हवाईदलातील अधिकार्‍यांच्या गणवेषावरील ‘शोल्डर पॅच’मध्ये चीनच्या नकाशावर अमेरिकेचे ‘एमक्यू-९ रिपर’ ड्रोन दाखविण्यात आले आहे. चीनच्या नकाशावर रिपर ड्रोन दाखवून अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या द्वीपसमुहांवर हल्ला चढविण्याची तयारी केल्याचा आरोप चीनने केला आहे. पण असे झाल्यास, अमेरिकेचे रिपर ड्रोन्स बेचिराख करु, चीनच्या लष्करी तंत्रज्ञानासमोर अमेरिकेच्या ड्रोनचा निभाव लागणार नसल्याची धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली.

रिपर

३ सप्टेंबर पासून अमेरिकेच्या नौदल आणि हवाईदलाचा कॅलिफोर्नियाच्या सागरी क्षेत्रात ‘एक्सरसाईज् एजाईल रिपर’ हा युद्धसराव सुरू आहे. अमेरिकी नौदलाच्या तिसर्‍या आरमाराबरोबर सुरू असलेल्या या युद्धसरावात विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या, विनाशिका, लढाऊ तसेच टेहळणी विमाने व मरिन्सचे पथक सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या परिस्थितीत सॅन क्लेमेंट बेटाचा ताबा घेण्याचा सराव यानिमित्ताने सुरू आहे. या युद्धसरावात अमेरिकेच्या ‘एमक्यू-९ रिपर’ या ड्रोन्सनी सहभाग घेतला असून हे ड्रोन्स सदर बेटावर हल्ले चढविण्याचा सराव करीत आहेत. सदर ड्रोन्सना हाताळणार्‍या अमेरिकन हवाईदलाच्या पथकाचा फोटोही यानिमित्ताने समोर आला आहे. यामध्ये शोल्डर पॅचवर चीनचा नकाशा लाल रंगात दाखवून त्यावरुन रिपर ड्रोन टार्गेटेड उड्डाण करीत असताना दाखविण्यात आले आहे.

रिपरजगभरातील हवाईदलातील वैमानिकांच्या शोल्डर पॅचवरील चित्र नेहमीच संदेश देणारे मानले जाते. या पॅचवरुन सदर पथकाच्या कामगिरीचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे सदर युद्धसरावात अमेरिकन वैमानिकांच्या शोल्डर पॅचवर चीनचा नकाशा आणि त्यावर रिपर ड्रोन दाखवून अमेरिकेने चीनला इशारा दिल्याचा दावा केला जातो. चीनच्या लष्करी विश्लेषक व मुखपत्राने याची दखल घेतली असून यावर संताप व्यक्त केला आहे. ‘अमेरिका चीनच्या विरोधात युद्ध पुकारण्याची तयारी करीत आहे. जगभरात संघर्षात हत्याकांड घडविणार्‍या रिपर ड्रोनचा वापर अमेरिका चीनबरोबरच्या या युद्धात करू शकतो, हाच संदेश अमेरिकेने या युद्धसरावातून दिला आहे’, अशी टीका चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ने केली. पण अमेरिकेच्या या रिपर ड्रोनला चीन भीत नसल्याचे ‘फू कियानशाओ’ या चिनी लष्करी विश्लेषकाने सदर मुखपत्रात म्हटले आहे.

रिपर

अमेरिकेच्या रिपर ड्रोनमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान नसून ते सहज लक्ष्य करता येईल, इतक्या खालून उड्डाण करता येते, असा दावा कियानशाओ यांनी केला. अमेरिकेने याआधी दहशतवादविरोधी युद्धात या ड्रोनचा वापर केला होता. पण इराण आणि येमेनमधील हौथी बंडखोरांनी अनेकदा अमेरिकेचे रिपर ड्रोन पाडून दाखविल्याची आठवण चिनी मुखपत्राने करुन दिली. त्यामुळे अमेरिकेने रिपर ड्रोन्सच्या सहाय्याने ‘साऊथ चायना सी’मध्ये संघर्ष पुकारण्याचा प्रयत्‍न केलाच तर ती युद्धची घोषणा समजली जाईल आणि यासाठी अमेरिकला जबर किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा कियानशाओ यांनी दिला. तर चीन सहजरित्या अमेरिकेच्या या ड्रोन्सना लक्ष्य करू शकतो. त्यामुळे अमेरिकेने रिपर ड्रोन्सच्या सहाय्याने ‘साऊथ चायना सी’मध्ये आगळीक करण्याआधी फेरविचार करावा, असे चीनच्या सरकारी मुखपत्राने धमकावले आहे.

 

leave a reply