बेकायदेशीररित्या घुसखोरी करणाऱ्यांचे लोंढे रोखण्यासाठी अमेरिकेचा कॅनडाशी करार

ओटावा/वॉशिंग्टन – मेक्सिकोबरोबरच कॅनडाशी जोडलेल्या सीमेवरून होणारी निर्वासितांची घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेने कॅनडाबरोबर नवा करार केल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन कॅनडाच्या दौऱ्यावर असून यावेळी झालेल्या चर्चेनंतर कराराची घोषणा करण्यात आली. करारानुसार, अमेरिका व कॅनडा हे दोन्ही देश सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या निर्वासितांना प्रवेश नाकारून माघारी पाठवू शकतील. २०२२च्या आर्थिक वर्षात अमेरिका-कॅनडा सीमेवरून जवळपास एक लाखांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.

बेकायदेशीररित्या घुसखोरी करणाऱ्यांचे लोंढे रोखण्यासाठी अमेरिकेचा कॅनडाशी करारअमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून अवैध घुसखोरीचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर असलेल्या मेक्सिकोमधून अवैध निर्वासितांचे लोंढे सातत्याने अमेरिकेत घुसखोरी करीत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे या घुसखोरीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सीमेवरील बहुतांश निर्बंध शिथिल केल्याने दर महिन्याला लाखो निर्वासित अमेरिकेत घुसत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यात १० लाखांहून अधिक निर्वासितांनी मेक्सिको सीमेवरून बेकायदेशीररित्या घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

मेक्सिको सीमेबरोबरच कॅनडा सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दाही चर्चेत येत आहे. यापूर्वी २००४ साली झालेल्या करारानुसार दोन देशांच्या सीमेवर असलेल्या अधिकृत ‘एन्ट्री पॉईंटस्‌‍’वर निर्वासितांना रोखण्याची तरतूद होती. मात्र दोन देशांमध्ये असलेल्या १००हून अधिक अधिकृत ‘एन्ट्री पॉईंटस्‌‍’व्यतिरिक्त अनेक बेकायदा मार्ग तयार झाले आहेत. या मार्गांवरूनही मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत.

बेकायदेशीररित्या घुसखोरी करणाऱ्यांचे लोंढे रोखण्यासाठी अमेरिकेचा कॅनडाशी करारअमेरिका व कॅनडा सीमा सुमारे नऊ हजार किलोमीटर लांबीची आहे. या सीमेवरून २०२१ च्या आर्थिक वर्षात २७ हजार जणांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. अवघ्या वर्षभरात ही आकडेवारी एक लाख, नऊ हजारांवर गेल्याने आता कॅनडा सीमेचा वापरही मेक्सिकोप्रमाणे होऊ लागल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हीदेखील गंभीर समस्या बनत चालल्याचे मानले जाते. अमेरिकेच्या संसदेतही यासंदर्भात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन बायडेन प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे नव्या करारावरून दिसते. नव्या करारात दोन देशांच्या सीमेवरून कोणत्याही भागात अवैध घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सदर निर्वासितांना माघारी पाठविण्याची तरतूद आहे.

अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांनी कराराचे स्वागत केले आहे. नव्या करारामुळे निर्वासितांच्या घुसखोरीला रोखण्यात मदत होईल, असा दावा दोन्ही देशांकडून करण्यात आला. मात्र कॅनडातून या करारावर टीका होत असून करारामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा प्रभाव अधिकच वाढेल, अशी नाराजी स्वयंसेवी गटांनी व्यक्त केली.

हिंदी English

 

leave a reply