चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास अमेरिकेसह मित्रदेश प्रत्युत्तर देतील

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यानी बजावले

वॉशिंग्टन/तैपई/बीजिंग – चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास अमेरिकेसह मित्रदेश त्याला प्रत्युत्तर देतील, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या नेतृत्त्वाकडून तैवानबाबत ग्वाही देण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध असल्याचे म्हटले होते. येत्या काही दिवसात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हर्च्युअल बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरते.

अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, ब्लिंकन यांना चीनच्या तैवानवरील हल्ल्याबाबत सवाल करण्यात आला. त्याला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अमेरिकेकडून यापूर्वी घेण्यात आलेली भूमिका व वक्तव्यांचा उल्लेख केला. ‘तैवान व नजिकच्या क्षेत्रात शांतता तसेच स्थैर्य नांदावे असे वाटणारा अमेरिका हा एकमेव देश नाही. तैवानची सध्या जी स्थिती आहे ती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाला तर तो शांती व सुरक्षेसाठी धोका आहे, असे मानणारे अनेक देश नजिकच्या क्षेत्रात तसेच त्यापलिकडेही आहेत. जर एकतर्फी कारवाई झाली तर हे देशही त्याला प्रत्युत्तर देणारे पाऊल उचलतील’, अशा शब्दात ब्लिंकन यांनी अमेरिकेसह इतर सहकारी देश चीनला प्रत्युत्तर देतील असे बजावले.

गेल्या वर्षभरात चीनची सत्ताधारी राजवट तैवानच्या मुद्यावर अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात तैवानचे विलिनीकरण चीनमध्ये होणारच, अशी हटवादी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर चीनमध्ये लष्करी तसेच इतर पातळ्यांवरही हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ‘वॉर पॉवर्स’ देण्यात आल्याचेही वृत्त समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेसह इतर मित्रदेशही आक्रमक झाले असून जपान व ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी तैवानच्या मुद्यावर आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जपानने तैवानच्या नजिकच्या क्षेत्रात नवी क्षेपणास्त्रे तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट’ उभारण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वानेही, चीन-तैवान युद्ध झाल्यास ऑस्ट्रेलिया त्यात उतरेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ब्लिंकन यांनी मित्रदेशांबाबत केलेल्या वक्तव्याला जपान व ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या पुढाकाराचा संदर्भ असल्याचे मानले जाते. दरम्यान, अमेरिकेच्या संसद सदस्यांनी तैवानला दिलेली भेट चीनला अस्वस्थ करणारी ठरली आहे. अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’ला मान्यता दिली असून तैवानबरोबर राजनैतिक पातळीवर संबंध विकसित करु नयेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. अमेरिकी संसद सदस्य संरक्षणदलाच्या विमानातून तैवानमध्ये दाखल झाल्याने ही भेट विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

leave a reply