अमेरिकेकडून युक्रेनला अडीच अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा

प्रायोगिक स्तरावरील शस्त्रास्त्रयंत्रणेचा समावेश

APKWS-fired-from-tactical-vehicleBAE-Systemsवॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मंगळवारी युक्रेनला अडीच अब्ज डॉलर्सच्या नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली. यात क्षेपणास्त्रे, रॉकेट सिस्टिम, दारुगोळा, रडार, ड्रोनविरोधी सिस्टिम्स, मॉर्टर्स व सशस्त्र वाहनांचा समावेश आहे. यावेळी अमेरिकेने अद्याप संरक्षणदलात सामील न केलेल्या प्रायोगिक स्तरावरील शस्त्रास्त्र यंत्रणेचाही युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्यात समावेश केला आहे. त्यामुळे अमेरिकी संरक्षणदल व कंपन्या युक्रेनचा ‘टेस्टिंग ग्राऊंड’ म्हणून वापर करीत असल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला जवळपास ३० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची शस्त्रे पुरविली आहेत. यात पॅट्रिऑट क्षेपणास्त्रे, जॅवलिन रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, स्टिंगर मिसाईल्स, हायमार्स रॉकेट सिस्टिम्स, ड्रोन्स यासारख्या प्रगत शस्त्रांचा समावेश आहे. पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिकी रणगाडेही युक्रेनमध्ये दाखल होतील, असे सांगण्यात येते.

अमेरिकेने दिलेल्या काही शस्त्रांची तसेच यंत्रणांची नोंद नसल्याचे दावे काही विश्लेषक व तज्ज्ञांनी केले होते. अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर यावेळी जाहीर करण्यात आलेल्या सहाय्यात असलेला ‘मोबाईल सी-युएएस लेझर गायडेड रॉकेट सिस्टिम’चा उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरतो. ही यंत्रणा अजूनही अमेरिकेच्या संरक्षणदलात तैनात झालेली नसून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. असे असतानाही अमेरिकेने ही रॉकेट यंत्रणा युक्रेनला दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply