अमेरिकेकडून रशियावर नव्या निर्बंधांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या कोषागार विभागाने शुक्रवारी रशियावर नव्या निर्बंधांची घोषणा केली. रशियन कंपन्या, बँका, उद्योजक आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संबंधित २५० अधिकाऱ्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. रशियावरील हे निर्बंध यशस्वी ठरत असून रशियन अर्थव्यस्थेला एकटे पाडण्यात अमेरिका यशस्वी ठरल्याचा दावा अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी केला. मात्र युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असताना, अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधानंतरही रशियन अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते.

रशिया-युक्रेन युद्धाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. या युद्धात रशियाची जबर आर्थिक तसेच जीवितहानी झाल्याचा दावा पाश्चिमात्य देश व त्यांची माध्यमे गेली वर्षभर करीत आहेत. रशियावर लादलेल्या निर्बंधांमध्ये इतर देशांनीही सहभागी व्हावे, असा दबाव अमेरिका व युरोपिय देशांनी आखाती तसेच आशियाई देशांवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण रशियावरील निर्बंधांचे दावे करणारे युरोपिय देश युक्रेनचे युद्ध सुरू असतानाही रशियाकडून इंधनाची खरेदी करीत असल्याचे यावेळी उघड झाले होते. त्याचबरोबर युक्रेनला शस्त्रपुरवठा करून अमेरिका व युरोपिय देशच या युद्धाची तीव्रता वाढवित असल्याचा आरोप रशियाने वारंवार केला होता.

दरम्यान, ‘आमचे निर्बंध अल्प तसेच दीर्घकाळासाठी रशियावर परिणाम करतील. यामुळे रशिया आर्थिक व लष्करीदृष्ट्या प्रभावित होईल’, असे अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी नव्या निर्बंधांची घोषणा करताना म्हटले आहे. पण गेल्या वर्षभरात अमेरिका, युरोपिय व मित्रदेशांनी रशियावर टाकलेल्या निर्बंधांना यश मिळालेले नाही, असा दावा अमेरिकेतील काही विश्लेषकच करीत आहेत.

leave a reply