इस्रायल-युएईकडून मानवरहित गस्ती जहाजाची निर्मिती

अबू धाबी – इस्रायल व युएई यांच्यातील संरक्षण सहकार्य पहिल्यांदाच जगासमोर प्रदर्शित करण्यात आले. या दोन्ही देशांनी संयुक्तरित्या तयार केलेले मानवरहित गस्ती जहाज अबू धाबी येथील शस्त्र प्रदर्शनात मांडण्यात आले. पर्शियन आखातापासून ते भूमध्य समुद्रापर्यंतच्या गस्तीसाठी या जहाजाचा वापर होऊ शकतो, असे संकेत इस्रायली माध्यमे देत आहेत. इस्रायल-युएईचे हे संयुक्त गस्ती जहाज इराणसाठी इशारा असल्याचा दावा ही माध्यमे करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी युएईची राजधानी अबू धाबी येथे ‘नेवल डिफेन्स अँड मॅरिटाईम सिक्युरिटी एक्झिबिशन-नॅवडेक्स’ सुरू आहे. यामध्ये जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या नौदल साहित्यांचे प्रदर्शन मांडले आहे. युएईबरोबरच्या ऐतिहासिक अब्राहम करारानंतर इस्रायल दुसऱ्यांदा या प्रदर्शनात सहभागी होत आहे. पण यावेळच्या प्रदर्शनात इस्रायलने युएईसोबत तयार केलेले जहाज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले.

अब्राहम करार झाल्यानंतर इस्रायल व युएईने संरक्षण सहकार्य वाढविण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून इस्रायलच्या ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रिज्‌‍-आयएआय’ या प्रसिद्ध कंपनीने युएईच्या ‘एज’ या कंपनीबरोबर मानवरहित गस्ती जहाज संयुक्तरित्या विकसित करण्याचे निश्चित केले होते. स्वयंचलित यंत्रणेबरोबरच रोबोटिक्स, सोनार यंत्रणांचा वापर करुन सदर गस्ती जहाज तयार करण्यात आले आहे.

या जहाजाचा वापर सागरी सीमेवरील गस्तीबरोबरच हेरगिरी, सागरी सुरुंगांचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो. तसेच पाणबुडीचा शोध घेणे आणि वेळ पडलीच तर पाणबुडीविरोधी युद्धात सहभागी होण्यासाठी या जहाजाचा वापर होईल, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. तर व्यापारी स्तरावर सागरी कचऱ्याची माहिती गोळा करणे, इंधन आणि इंधनवायूच्या उत्खननात सहाय्यक आणि बचावकार्यासाठी देखील या जहाजाचा वापर होऊ शकतो, अशी माहिती इस्रायली कंपनीने या प्रदर्शनात दिली.

दरम्यान, इस्रायल-युएईने तयार केलेले मानवरहित गस्ती जहाज इराणसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. पर्शियन आखात, एडनचे आखात, रेड सी या सागरी क्षेत्रातील इराणच्या वाढत्या आक्रमकतेला या गस्ती जहाजाने उत्तर देण्याची तयारी इस्रायल व युएईने केली आहे, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply