अमेरिकेकडून ‘वॅग्नर ग्रुप’ ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना असल्याची घोषणा

रशियाकडून तीव्र टीकास्त्र

john kirbyवॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेन युद्धात सहभागी झालेली ‘वॅग्नर ग्रुप’ ही रशियाची खाजगी लष्करी कंपनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असल्याची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी याची माहिती दिली. अमेरिकेच्या या घोषणेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिका तथ्यहीन दावे करून रशियन कंपन्यांना लक्ष्य करीत असल्याची टीका रशियन प्रवक्त्यांनी केली. रशियन कंपनीला गुन्हेगारी संघटना घोषित करतानाच त्याला सहाय्य करणाऱ्या चिनी कंपनीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

गेल्या दशकापासून ‘वॅग्नर ग्रुप’ ही खाजगी लष्करी कंपनी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय असणाऱ्या येव्हगेनी प्रिगोझिन यांनी या कंपनीची उभारणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा गट रशिया व युक्रेनसह आफ्रिका तसेच लॅटिन अमेरिकी देशांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ साली अमेरिकेने या कंपनीवर पहिल्यांदा निर्बंध लादले होते. त्यानंतर २०१८ साली वॅग्नर ग्रुपचे प्रमुख असणाऱ्या प्रिगोझिन यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. युरोपिय महासंघ, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांनीही ‘वॅग्नर ग्रुप’विरोधात निर्बंध लादले आहेत.

wagnergroupरशिया-युक्रेन युद्धात अनेकदा या कंपनीची पथके वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आल्याचे समोर आले होते. डोनेत्स्क, मारिपोल, सोलेदार यासारख्या भागात झालेल्या संघर्षांमध्ये वॅग्नर ग्रुपचे नाव उघड झाले होते. सोलेदार ताब्यात घेण्यात याच कंपनीच्या पथकांनी महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे दावे करण्यात आले होते. या कंपनीच्या कामगिरीवरून रशियाच्या अंतर्गत वर्तुळात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दावेही पाश्चिमात्य माध्यमे व यंत्रणांकडून करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने रशियन लष्करी कंपनीला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना घोषित करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. वॅग्नर ग्रुपकडे जवळपास ५० हजार प्रशिक्षित जवान असून त्यात रशियाव्यतिरिक्त इतर देशांमधील जवानांचाही समावेश असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. गेल्या वर्षी आफ्रिकेतील काही देशांमध्ये वॅग्नर ग्रुपची पथके तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. फ्रान्सने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती.

leave a reply