तैवानबरोबरील संरक्षण कराराला अमेरिकेची मंजुरी

संरक्षण करारालावॉशिंग्टन/तैपेई – युक्रेन युद्ध व चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर तैवानची संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी अमेरिकेने अधिक व्यापक हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला नवे संरक्षणसहाय्य मंजूर केले आहे. यात ‘पॅट्रिऑट मिसाईल सिस्टिम’ची तैनाती व देखभाल यांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने तैवानमध्ये तैनात पॅट्रिऑट क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली होती.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधातील आक्रमक धोरणाचा भाग म्हणून तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांपूर्वी अमेरिका व तैवानमध्ये ‘एफ-१६ व्ही’ या लढाऊ विमानांच्या खरेदीचा महत्त्वाकांक्षी करार करण्यात आला होता. त्यापाठोपाठ अमेरिकेने तैवानला ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘हाय मार्स’ रॉकेट यंत्रणा, ‘स्लॅम-इआर’ क्षेपणास्त्रे देण्याचीही घोषणा केली होती. याच काळात तैवानने ’पॅट्रिऑट मिसाईल्स’, ड्रोन्स, स्मार्ट माईन्स व हॉवित्झर्ससंदर्भात बोलणी सुरू केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

संरक्षण करारालायातील हॉवित्झर्स व ’पॅट्रिऑट मिसाईल्स’च्या पुरवठ्यासंदर्भातील करार पार पडले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने घेतलेला निर्णय त्याचाच भाग आहे. या निर्णयाअंतर्गत पॅट्रिऑट मिसाईल्सची तैनाती व संबंधित तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ९.५ कोटी डॉलर्सचा करार करण्यात येणार आहे. बायडेन प्रशासनाकडून तैवानला संरक्षणसहाय्य पुरविण्यासंदर्भातील हा तिसरा करार ठरला आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले आहेत. जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या संसदेत ‘आर्म तैवान ऍक्ट’ नावाचे विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकात तैवानला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्स संरक्षणसहाय्य पुरविण्याची तरतूद आहे.

leave a reply