तटस्थता सोडून भारत युक्रेनच्या युद्धात कुणाचीही बाजू घेणार नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – युक्रेनची राजधानी किव्हजवळील बुचा येथील हत्याकांडासाठी रशियाला धारेवर धरून अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर निर्बंधांचा सपाटा लावला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही बुचा येथील या हत्याकांडाची निर्भत्सना केली. मात्र यासाठी रशियाला जबाबदार न धरता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या हत्याकांडाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. युक्रेनच्या युद्धात भारताने कुणाचीही बाजू न घेता तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. कुणाची बाजू घ्यायचीच असेल, तर भारत शांतीचा पुरस्कार करील, असे सूचक उद्गार परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत काढले.

युक्रेनच्या युद्धातमंगळवारी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची युक्रेन युद्धाबाबतची भूमिका नेमक्या शब्दात मांडली. कुणाचीही बाजू न घेता भारत आपली निष्पक्षता कायम राखणार असल्याचा निर्वाळा यावेळी जयशंकर यांनी दिला. त्याचवेळी या युद्धाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. याबरोबरच या युद्धाची फार मोठी झळ बसलेल्या देशांनाही भारत अन्नधान्य, साखरेचा पुरवठा करीत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. श्रीलंकेला भारत इंधन व अन्नधान्याचा पुरवठा करीत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

काही देशांनी भारताकडे गहू आणि साखरेची मागणी केलेली आहे. त्याला भारत सकारात्मक प्रतिसाद देत आहे. युद्धग्रस्त असलेल्या युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी भारताकडे अतिरिक्त औषधांची मागणी केलेली आहे. लवकरच भारत युक्रेनला हे सहाय्य पुरविल, अशी घोषणा परराष्ट्रमंत्र्यांनी केली. ही माहिती देत असतानाच, भारताने आपल्या हजारो विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढले व अशी घटना याआधी कधीही घडली नव्हती, याकडे संसदेचे लक्ष वेधले. युद्ध सुरू असताना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे हे फार मोठे आव्हान होते. परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच इतर मंत्रालयांनीही यासाठी पुढाकार घेतला आणि सांघिक प्रयत्नांनी ऑपरेशन गंगा यशस्वी करून दाखविले, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारताच्या या मोहिमेमुळे इतर देशांनाही प्रेरणा मिळाली, असा दावा यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. जागतिक व्यवस्था (वर्ल्ड ऑर्डर) बदलण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेली आहे. कोरोनाची साथ, अफगाणिस्तानातील घडामोडी आणि आत्ता सुरू असलेले युक्रेनचे युद्ध यामुळे ही जागतिक व्यवस्था अधिकच बदलत असल्याची नोंद यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेतील आपल्या भाषणात केली.

आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोनाद्वारे या बदलत्या जागतिक व्यवस्थेला सामोरे जावे लागेल. आत्मनिर्भर भारत हे केवळ आर्थिक धोरण नाही. तर आपल्या जनतेची काळजी घेणारा, त्यासाठी ऑपरेशन गंगा राबविण्याची क्षमता असलेला भारत, हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे उदाहरण ठरते, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनच्या युद्धाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेवर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आहे. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर देशाची एकजूट असल्याचे संसदेतील या चर्चेतून उघड झाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

leave a reply