तैवानच्या हद्दीत लढाऊ विमानांची घुसखोरी वाढविणार्‍या चीनला अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा इशारा

तैवानच्या हद्दीततैपेई/कॅनबेरा/बीजिंग – चीनकडून तैवानच्या हवाईहद्दीत सुरू असणार्‍या घुसखोरीवर अमेरिका व ऑस्ट्रेलियाने टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी, चीनच्या लष्करी कारवाया चिथावणीखोर असल्याचे सांगून अमेरिका तैवानच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र विभागानेही चीनच्या घुसखोरीवर आक्षेप घेतला असून, बळाचा वापर करून इंडो-पॅसिफिकमधील स्थैर्य बिघडवू नये, असे चीनला बजावले आहे. चीनच्या घुसखोरीवर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची खरमरीत प्रतिक्रिया उमटली असून, चीनने आक्रमणाचा प्रयत्न केल्यास क्षेत्रिय शांतता धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या चार दिवसात चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. सोमवारी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या तब्बल ५६ विमानांनी तैवानच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. या वर्षात चीनकडून सुरू असलेल्या घुसखोरीच्या प्रमाणात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

चीनने मार्च २०१९ पासून तैवानच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी चिनी विमानांनी ३८० वेळा घुसखोरी केली होती. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच घुसखोरी करणार्‍या चिनी विमानांची संख्या ६००वर गेली आहे. गेल्या चार दिवसात चीनने १४९ विमाने घुसविल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. चिनी विमानांची ही घुसखोरी ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग असून तैवानची संरक्षणक्षमता व मनोधैर्य खच्ची करण्याचा उद्देश त्यामागे आहे. गेल्या काही दिवसातील चिनी विमानांच्या हालचाली तैवानविरोधातील आक्रमणाची क्षमता दाखवून देणार्‍या असल्याचा दावाही विश्‍लेषकांनी केला आहे.

चीनच्या या कारवायांवर तैवानसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तैवाननजिक सुरू असलेल्या चीनच्या लष्करी हालचाली चिथावणी देणार्‍या असून त्यावर अमेरिका तीव्र चिंता व्यक्त करीत आहे. चीनच्या कारवाया धोका वाढविणार्‍या असून शांतता व स्थैर्य कमकुवत करणार्‍या ठरल्या आहेत. चीनने तैवानवर लष्करी, राजनैतिक तसेच आर्थिक पातळीवरून दडपण आणण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत’, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी बजावले. यावेळी त्यांनी अमेरिका तैवानला संरक्षणसहाय्य पुरविण्याचे धोरणही कायम ठेवेल, असेही स्पष्ट केले. अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियानेही चीनच्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘चीनची वाढती घुसखोरी चिंताजनक आहे. तैवानच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी चीनने बळाचा, दडपणाचा किंवा धमकावणीचा मार्ग अवलंबू नये’, असा इशारा ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुरक्षित राहणे गरजेचे असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हायला हवे, असा टोलाही लगावला. परराष्ट्र विभाग चीनला सुनावत असतानाच ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबॉट तैवान भेटीवर दाखल झाले आहेत.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन तसेच पंतप्रधान सु त्सेंग-चँग यांनीही चीनच्या घुसखोरीवर आक्रमक प्रतिक्रिया नोंदविली. तैवानला लष्करी संघर्ष नको आहे, पण लोकशाही व जीवनशैलीला धोका उत्पन्न झाला तर सुरक्षेसाठी तैवान टोकाची पावले उचलू शकतो, असा इशारा राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिला आहे. त्याचवेळी चीनच्या आक्रमणासमोर तैवान पराभूत झाला तर त्याचे आशियातील शांततेवर भयावह परिणाम दिसून येतील, असेही इंग-वेन बजावले. पंतप्रधान सु त्सेंग-चँग यांनी चीनची वाढती घुसखोरी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चीनचे इशारे धुडकावून फ्रान्सचे शिष्टमंडळ तैवानला भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या शुक्रवारी फ्रान्सच्या संसद सदस्यांचे शिष्टमंडळ तैवानच्या संसदेला भेट देणार असल्याची माहिती तैवान सरकारकडून देण्यात आली. फ्रेंच सदस्यांनी तैवानला भेट देऊ नये, असा इशारा फ्रान्समधील चिनी राजदूतांनी दिला होता.

leave a reply