इराणमधील मुलींच्या 30 शाळांवर विषप्रयोग

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांकडून पाश्चिमात्य देशांवर आरोप

विषप्रयोगतेहरान – इराणच्या पाच प्रांतांमधील किमान 30 हून अधिक मुलींच्या शाळांमध्ये विषप्रयोग झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे किमान 100 हून अधिक मुली आजारी पडल्या असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा केला जातो. आपल्या टीकाकारांना अद्दल घडविण्यासाठी इराणच्या राजवटीने मुलींच्या शाळांवर हा विषप्रयोग केल्याचा आरोप इराणमधील विरोधी गट करीत आहेत. पण इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी या विषप्रयोगामागे इराणचे शत्रू असल्याचा ठपका ठेवला आहे.

इराणच्या हामेदान, झंजान, वेस्ट अझरबैजान, फार्स आणि अल्ब्रोझ या प्रांतांमधील मुलींच्याच शाळांवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजधानी तेहरानच्या दक्षिणेकडील कोम शहरात पहिल्यांदा विषप्रयोगाचे प्रकरण समोर आले होते. संबंधित शाळेतील मुलींनी इराणच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. कोम हे शहर इराणच्या राजवटीचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या इराणच्या राजवटीने सदर मुलींच्या शाळेवरच विषप्रयोग केल्याचे आरोप झाले होते.

विषप्रयोगगेल्या आठवड्यात वेगवेगळ्या शहरांमधील शाळेतूनही विषप्रयोगाच्या बातम्या समोर येऊ लागल्यानंतर पुन्हा या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली. इराणच्या राजवटीने याबाबतच्या बातम्या देण्याचे टाळले. पण शाळांच्या आवारात रुग्णवाहिकांची झालेली गर्दी आणि या रुग्णवाहिकांच्या रांगांमुळे रस्त्यावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर इराणच्या राजवटीला याची माहिती जाहीर करावी लागली. तर शाळांमधील मुलींवर विषप्रयोग तसेच विषारी वायूचा हल्ला झाल्याचा दावा ब्रिटनमधील वृत्तवाहिनीने केला.

गेल्या चार महिन्यांमध्ये इराणच्या पाच प्रांतांमधील 30 हून अधिक शाळांमधील मुलींवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे. 900 हून अधिक मुलींना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे इराणमधील सूत्रांच्या हवाल्याने करीत आहेत. पण इराणची राजवट याबाबत वेगळीच माहिती प्रसिद्ध करीत आहेत. किमान 10 शाळांवरच विषप्रयोग झाला असून 100 हून अधिक मुली आजारी पडल्याचे इराणच्या राजवटीने म्हटले आहे. तसेच यामागे इराणचे शत्रू असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केला. इराणच्या जनतेमध्ये भीती आणि अस्थैर्य निर्माण करण्यासाठी शत्रू देशांनी हे कारस्थान रचल्याचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात इराणच्या राजवटीच्या विरोधात सुरू झालेली निदर्शने लष्करी बळाचा वापर केल्यामुळे थंडावली आहेत. मात्र इराणच्या जनतेमध्ये राजवटविरोधात असंतोष धगधगत असल्याचा दावा इराणमधील विश्लेषक करीत आहेत.

leave a reply