दूतावासांवरील बंदीनंतर अमेरिका-चीन संबंध अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता

- अमेरिकेच्या लष्करी विमानांच्या चीननजिक हालचाली वाढल्या

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी सोमवारी चेंगदूमधील अमेरिकेच्या दूतावासाच्या ताबा घेतला. ही कारवाई अमेरिकेने ह्युस्टनमधील दूतावासावर टाकलेल्या बंदीवरील प्रतिक्रिया म्हणून करण्यात आली, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चेंगदूबाबत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. अमेरिका व चीनने परस्परांच्या दूतावासावर केलेली कारवाई ही सुरुवात असून, दोन देशांमधील संघर्षाची व्याप्ती व तीव्रता पुढील काळात अधिक वाढू शकते, असे दावे विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या लष्करी विमानांच्या चीन हद्दीनजिकच्या हालचाली वाढल्याची माहिती समोर आली आहे.

America-Chinaगेल्या आठवड्यात अमेरिकेने ह्युस्टन शहरातील दूतावास बंद करण्याचे आदेश चीनला दिले होते. हा दूतावास चीनकडून अमेरिकेत सुरू असणाऱ्या हेरगिरी कारवायांचे केंद्र असल्याचा दावा, अमेरिकेने केला होता. अमेरिकेची ही कारवाई एकतर्फी व चिथावणी देणारी असल्याचा आरोप करून चीनने अमेरिकेचा चेंगदूमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. चीनच्या या निर्णयानंतर अमेरिकेने रविवारी दूतावासातील आपले सामान हलविले होते. सोमवारी सकाळी दूतावासाबाहेरील अमेरिकेचा ध्वज खाली उतरवून चीनच्या यंत्रणांनी दूतावासाच्या इमारतीचा ताबा घेतला.

चीनची प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर या घटनेची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली असून दूतावासाबाहेर अमेरिकेविरोधात घोषणाही देण्यात आल्या. अमेरिका व चीनमध्ये दूतावासावरील कारवाईवरून निर्माण झालेला तणाव पुढील काळात अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. चीनमधील राष्ट्रवादी गट व काही विश्लेषकांनी हॉंगकॉंगमधील अमेरिकेचा दूतावासही बंद करावा, अशी आक्रमक मागणी केली आहे.

त्याचवेळी अमेरिकेतील माध्यमे व विश्लेषकांनी ह्युस्टनपाठोपाठ सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावरही कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. अमेरिकी यंत्रणांनी हेरगिरीच्या आरोपाखाली कारवाई केलेल्या जुआन तांग या चिनी संशोधिकेला या दूतावासाने आश्रय दिला होता. अमेरिकेकडून काही चिनी अधिकाऱ्यांची हकालपट्टी तसेच नव्या निर्बंधांची घोषणा होऊ शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

America-Chinaदरम्यान, गेल्या दोन महिन्यात अमेरिकेच्या लष्करी व टेहळणी विमानांच्या चीननजिकच्या घिरट्या वाढल्याचा दावा एका चिनी अभ्यासगटाने केला. शनिवारी अमेरिकेच्या ‘पी-८ए अँटी सबमरीन प्लेन’ने चीनमधील व्यापारी केंद्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शांघाय शहरापासून अवघ्या ४७ मैलांच्या अंतरावरून उड्डाण केल्याची माहिती ‘पेकिंग युनिव्हर्सिटीती’तील अभ्यासगटाने दिली. अमेरिकेच्या लष्करी विमानाने एखाद्या चिनी शहरापासून इतक्या जवळच्या अंतरावरून उड्डाण करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते.

त्यापाठोपाठ अमेरिकी लष्कराच्या ‘ईपी-३ई’ या टेहळणी विमानाने ग्वांगडाँग शहरापासून १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरुन घिरट्या घातल्याचेही चिनी अभ्यासगटाकडून सांगण्यात आले. अमेरिकेची लष्करी व टेहळणी विमाने सलग १२ दिवस चीनच्या हद्दीनजिक उड्डाण करीत असल्याचा दावाही या अभ्यासगटाने केला. जुलै महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात अमेरिकेच्या लष्करी तसेच टेहळणी विमानांनी साऊथ चायना सी क्षेत्रातील चीनच्या हद्दीनजीक किमान ५० वेळा उड्डाण केल्याची माहितीही समोर आली आहे.

leave a reply