पाकिस्तानच्या पेशावरमध्ये भीषण आत्मघाती हल्ला

- ५० जणांचा बळी गेल्याचा दावा

आत्मघाती हल्लाइस्लामाबाद – कंगाली, महागाई, बेकारी आणि अन्नधान्यापासून डिझेल-पेट्रोलचीही टंचाई या साऱ्या समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानला आपणच पोसलेल्या दहशतवादाचेही दणके बसत आहेत. ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानच्या पेशावर शहरातील सुरक्षित भाग गणल्या जाणाऱ्या एका प्रार्थनास्थळात भीषण आत्मघाती हल्ला घडवून जवळपास ५० जणांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यातील जखमींची संख्या दिडशेहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी पेशावर पोलिस स्थानकाच्या आवारातील प्रार्थनास्थळात ‘तेहरिक’च्या दहशतवाद्याने आत्मघाती स्फोट घडवून आणला. हा पेशावरमधील अतिसुरक्षित भाग मानला जातो. हा आत्मघाती स्फोट झाला त्यावेळी या ठिकाणी ३०० ते ४०० पोलीस होते, असे एका पोलीस अधिकाऱ्यानेच म्हटले आहे. त्यामुळे उघड केली जात आहे, त्याहूनही या स्फोटातील बळींची संख्या कितीतरी अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की प्रार्थनास्थळाची भिंत देखील कोसळली. या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

या स्फोटात बळी पडलेल्यांमध्ये पोलीस दलाचे जवानांचा सर्वाधिक प्रमाणात समावेश असल्याचा दावा ‘तेहरिक’ने केला आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारीत असताना, तेहरिकचा कमांडर उमर खालिद खोरासानी याने हा दावा केला आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर व तेहरिकमधील संघर्षबंदी संपुष्टात आली होती. त्यानंतर तेहरिकच्या नेत्यांनी आपल्या समर्थकांना पाकिस्तानचे लष्कर, निमलष्करी दल तसेच पोलिसांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कर तसेच पोलिसांवरही तेहरिकचे घणाघाती हल्ले सुरू झाले होते. पाकिस्तानच्या सरकार तसेच लष्कराने तेहरिकच्या विरोधात कठोर कारवाईची घोषणा करून दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे दावे केले होते. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानने ‘तेहरिक’ला रोखावे, असे आवाहन देखील पाकिस्तानच्या सरकारने केले होते. पण पाकिस्तानच्या धोरणांवर अफगाणिस्तानातील तालिबान नाराज असून हा देश अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याची टीका अफगाणिस्तानातील तालिबानचे नेते करू लागले आहेत.

अशा परिस्थितीत तेहरिकच्या मार्फत पाकिस्तानला धडा शिकविण्याची तयारी अफगाणिस्तानातील तालिबानने केल्याचे दिसत आहे. यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. मात्र या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक नाही, तर लष्कर व सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकार व लष्कराच्या चिंता अधिकच वाढल्याचे दिसते. तसेच या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे.

पेशावर ही खैबर पख्तुनख्वा राज्याची राजधानी आहे. या राज्यामध्ये इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’चे सरकार आहे. हे सरकार दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारकडून केली जाते. तर इम्रान खान व त्यांचे सहकारी हे पाकिस्तानच्या सरकारचे अपयश असल्याचे दावे करीत आहेत.

हिंदी

leave a reply