फिलिपाईन्सच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध आहे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

मनिला – येत्या काळात फिलिपाईन्सच्या सागरी हितसंबंधांवर हल्ला झालाच तर अमेरिका फिलिपाईन्सच्या सुरक्षेबाबत वचनबद्ध आहे. अमेरिका फिलिपाईन्सला आवश्यक लष्करी सहाय्य पुरविल, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली. यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी 1951 सालच्या उभय देशांमध्ये झालेल्या सामंजस्य सुरक्षा कराराची आठवण करून दिली. ब्लिंकन यांनी थेट उल्लेख टाळला असला तरी चीनच्या धोक्याकडे लक्ष वेधल्याचे उघड आहे.

असियानच्या बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांची भेट घेतली. तर फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री एन्रीक मनालो यांच्याबरोबर परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. गेल्या आठवड्यात पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख ब्लिंकन यांनी केला. तसेच येत्या काळात फिलिपाईन्सचे लष्कर, प्रवासी जहाजे आणि विमानांवर इतर देशांच्या लष्कराने हल्ले चढविले तर अमेरिका सामंजस्य सुरक्षा करारानुसार, फिलिपाईन्सला आवश्यक लष्करी सहाय्य पुरविल, असे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. तसेच फिलिपाईन्स हा अमेरिकेचा बदलता न येण्याजोगा मित्र, सहकारी देश असल्याचा दावा ब्लिंकन यांनी केला.

leave a reply