चीन-तैवानच्या विनाशिका आमनेसामने

विनाशिका आमनेसामनेतैपेई/वॉशिंग्टन – आक्रमक युद्धसरावाद्वारे तैवानमधील त्साई ईंग-वेन यांच्या सरकारवर दबाव टाकण्याचा चीनचा डाव तैवानने हाणून पाडला. 10 विनाशिकांद्वारे प्रत्यक्ष युद्धाचा सराव करणाऱ्या चीनला तैवानने त्याच भाषेत उत्तर दिले. चीनच्या या विनाशिकांच्या विरोधात तैवानने देखील आपल्या दहा विनाशिका रवाना केल्या. एका क्षणाला चीन व तैवानच्या विनाशिका आमनेसामने आल्या होत्या.

अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध करण्यासाठी चीनने चार दिवसांचा तातडीचा युद्धसराव सुरू केला होता. या सरावात चीनने तैवानच्या हवाई क्षेत्राजवळ शंभरहून अधिक लढाऊ, बॉम्बर विमाने रवाना केली. तैवानला घेरून सहा ठिकाणी चीनच्या युद्धनौका आणि विनाशिकांचा मोठा ताफा या सरावात सहभागी झाला होता. या सरावाच्या शेवटच्या दिवशी चीनच्या विनाशिकांनी तैवानच्या सागरीक्षेत्राजवळून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या तैवानच्या विनाशिकांनी चिनी विनाशिकांपासून काही अंतरावरुन प्रवास केला आणि चीनच्या हालचालींवर आपली नजर असल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, तैवानच्या आखाताजवळ युद्धसरावाचे आयोजन करणाऱ्या चीनला अमेरिका, ऑस्ेलिया आणि जपान या देशांनी सदर सराव थांबविण्याचे आवाहन केले आहे. पेलोसी यांचा तैवान दौरा या क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी सहाय्यक होता, असे सांगून अमेरिका, ऑस्ेलिया व जपानने अमेरिकन नेत्यांच्या तैवान भेटीचे समर्थन केले. पूर्व आशियात तणाव निर्माण करणारा युद्धसराव चीनने त्वरीत थांबवावा, यासाठी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन चीनच्या संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. पण चीनने पेंटॅगॉनच्या फोनला उत्तर दिले नसल्याचे अमेरिकी माध्यमाचे म्हणणे आहे.

leave a reply