अमेरिकेचे संरक्षणदल अंतराळात लेझरची चाचणी घेणार

test lasersकेप कॅनावेरल – लष्करी वाहन, विनाशिका आणि विमानातून लेझरची चाचणी घेणाऱ्या अमेरिकेच्या संरक्षणदलाने अंतराळात लेझरचा वापर करण्याची तयारी केली आहे. पण या चाचणीनंतर लेझरचा वापर लष्करी स्तरावर नाही तर नागरी स्तरावर केला जाणार असल्याचे अमेरिकेच्या नौदल आणि स्पेस फोर्सने स्पष्ट केले. ही लेझर चाचणी महत्त्वाची ठरेल, असा दावा अमेरिकेचे संरक्षणदल व यात सहभागी असलेल्या यंत्रणा करीत आहेत. पण अंतराळातील लेझरचा वापर अन्य आव्हानांना देखील आमंत्रण देणारा ठरेल, असे लष्करी विश्लेषक बजावत आहेत.

दोन दिवसांपूर्वी फ्लोरिडाच्या प्रक्षेपण तळावरुन ‘ड्रॅगन कार्गो’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित सात यंत्रणा यामध्ये आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’, संरक्षण विभागाबरोबरच प्रसिद्ध उद्योजक व गुंतवणूकदार एलॉन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी या प्रयोगात सहभागी झाले आहेत. तर अमेरिकेचे नौदल आणि स्पेस फोर्स या प्रयोगावर काम करीत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्पेस वायरलेस एनर्जी लेझर लिंक-एसडब्ल्यूईएलएल’ या लेझर यंत्रणेची अंतराळात चाचणी होईल.

एसडब्ल्यूईएलएल अर्थात ‘स्वेल’ ही लेझर यंत्रणा अजूनही प्रारंभावस्थेत असल्याचा दावा अमेरिकेची नौदल प्रयोगशाळा करीत आहे. अंतराळातील उपग्रहांवरील सोलर पॅनलवर साठविलेल्या सौरऊर्जेचा वापर करून लेझर बिमची चाचणी घेण्यात येईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर ही चाचणी पार पडेल. स्वेलमधून प्रवाहित झालेले लेझर बिम उपग्रहाद्वारे ‘इलेक्ोमॅग्नेटिक लहरीं’च्या माध्यमातून थेट पृथ्वीवर प्रक्षेपित केले जातील. लेझर बिमने प्रवाहित झालेल्या या इलेक्ोमॅग्नेटिक लहरी ऊर्जेच्या स्वरुपात पृथ्वीवरील तळांवर साठविल्या जातील व पुढे त्यांचा वापर ऊर्जेसारखा केला जाईल, अशी माहिती अमेरिकन नौदल आणि स्पेस फोर्सने दिली.

test lasers in spaceलेझर बिमच्या एका उपकरणातून 1 ते 10 मिलिवॅट इतक्या ऊर्जेची निर्मिती होते, असे फोर्बस्‌‍ या नियतकालिकेने आपल्या अहवालात म्हटले होते. तर अमेरिकेतील किनारपट्टीवर बसविलेल्या पवनचक्कीतून जेमतेम 2.5 ते 3 मिलिवॅट इतकी ऊर्जा निर्मिती होते. त्यामुळे लेझर बिमची ऊर्जा अतिशय सहाय्यक व परवडण्यासारखी असल्याचा दावा अमेरिकन यंत्रणा करीत आहे.

तसेच या लेझर बिमचा वापर करून अंतराळातील उपग्रह दीर्घकाळासाठी चालविले जाऊ शकतात. अतिदूर अंतरावरील अंतराळ मोहिमा देखील चालविता येऊ शकतात आणि चंद्रावर ऊर्जेचा साठा केला जाऊ शकतो, याकडे अमेरिकेच्या यंत्रणा लक्ष वेधत आहेत.

मात्र अंतराळातील लेझरचा वापर उपग्रहांच्या सुरक्षेला आव्हान देणारा ठरू शकतो, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. या आघाडीवर एकटी अमेरिकाच नाही तर चीनदेखील अंतराळात लेझर बिमच्या वापरासाठी तयारी करीत आहे. त्याचबरोबर 2030 सालापर्यंत अंतराळात ऊर्जाप्रकल्प उभारण्याची तयारीही चीनने केली आहे.

leave a reply