अमेरिकेने संरक्षणखर्च ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवावा

- विश्‍लेषकाची मागणी

संरक्षणखर्चवॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्ध व चीनचा वाढता धोका या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने आपल्या संरक्षणखर्चासाठी एक ट्रिलियन डॉलर्सची तरतूद करायला हवी, असा दावा विश्‍लेषक रिच लॉरी यांनी केला आहे. रशियाकडून युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याचा उल्लेख करीत अमेरिकेकडे एकाच वेळेस युरोप व आशियातील आघाडी सांभाळण्याची क्षमता हवी, असे लॉरी यांनी म्हटले आहे. लष्कर, नौदल व हवाईदलासह अंतराळक्षेत्र, सायबर, आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, डायरेक्टेड एनर्जी या तंत्रज्ञानातही अमेरिकेने आघाडी घ्यायलाच हवी, असा सल्ला अमेरिकी विश्‍लेषकांनी दिला.

संरक्षणखर्चकाही दिवसांपूर्वी चीनने आपल्या संरक्षणखर्चात सात टक्क्यांहून अधिक वाढ करून असल्याचे जाहीर केले होते. या नव्या वाढीनंतर चीनचा संरक्षणखर्च २३० अब्ज डॉलर्सवर जाणार आहे. गेली सात वर्षे चीन सातत्याने आपल्या संरक्षणखर्चात सहा टक्क्यांहून अधिक वाढ करीत आहे. या वाढत्या संरक्षणखर्चाच्या बळावर चीनने काही वर्षांपूर्वी अमेरिकी नौदलाला मागे टाकून जगातील सर्वात मोठे नौदल होण्याची कामगिरी केली होती. दुसर्‍या बाजूला हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, स्पेस वेपन्स, लेझर्स या क्षेत्रातही चीनने अमेरिकेला मागे टाकण्यात यश मिळवल्याचे रिच लॉरी यांनी आपल्या विस्तृत लेखाद्वारे लक्षात आणून दिले.

संरक्षणखर्चत्याचवेळी रशियाही आपल्या संरक्षणक्षमतेत मोठी भर टाकत असून युक्रेनवरील हल्ल्यात रशियन संरक्षणयंत्रणांनी मोठा विध्वंस घडविल्याचे दिसत आहे. रशिया व चीनच्या या वाढत्या क्षमतांचा उल्लेख करून रिच लॉरी यांनी पुढील काळात अमेरिकेवर या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करण्याची वेळ ओढवू शकते, असा इशारा दिला. त्यामुळे पुढील काळात संरक्षणक्षमता वाढविताना युरोप व आशिया या दोन्ही खंडातील तैनातीचा विचार व्हायला हवा, याकडे लॉरी यांनी लक्ष वेधले.

एकाच वेळी दोन आघाड्यांवर तैनाती करण्यासाठी शस्त्रसाठ्यात मोठी भर टाकायला हवी, असे त्यांनी पुढे नमूद केले. ‘अमेरिकी नौदलाने आपल्या ताफ्यातील युद्धनौकांची संख्या ५००वर न्यायला हवी. संरक्षणदलामध्ये दीर्घ पल्ल्याची ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’ची (अचूक लक्ष टिपणार्‍या) संख्या वाढवणे आवश्यक आहे. ‘न्यूक्लिअर फोर्स’चे आधुनिकीकरण, नवी स्टेल्थ लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या नव्या तुकड्या यासाठी हालचाली करायला हव्यात’, याची जाणीव रिच लॉरी यांनी आपल्या लेखात करून दिली आहे.

संरक्षणखर्च‘सध्या अमेरिकेचा संरक्षणखर्च ७७० अब्ज डॉलर्स आहे. पुढील वर्षी तो ८०० अब्ज डॉलर्सवर जायला हवा व त्यानंतर संरक्षणक्षेत्रासाठी एक ट्रिलियन डॉलर्सची तरतूद करायला हवी’, असा दावा लॉरी यांनी केला आहे.

लॉरी यांच्यासारखे विश्‍लेषक अमेरिकेचा संरक्षणखर्च सव्वदोनशे अब्ज डॉलर्सहून अधिक प्रमाणात वाढविण्याची मागणी करीत असताना, अमेरिकेसह जगभरात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील ‘मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स’ अर्थात शस्त्रनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या जगभरात युद्ध-संघर्ष पेटवून आपले उखळ पांढरे करीत असल्याचे आरोप होत आहेत. सध्या युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या मागे देखील अमेरिकेतील हे गट असल्याचे दावे अमेरिकन नेते करीत आहेत. अशा परिस्थितीत लॉरी यांनी केलेली ही मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply