अमेरिका आखातातील हवाई सुरक्षा यंत्रणा काढून युक्रेनमध्ये तैनात करणार

- रेदॉन कंपनीचा दावा

हवाई सुरक्षा यंत्रणाव्हर्जिनिआ – अमेरिका आणि आखाती देशांमधील दरी अधिकाधिक रुंदावत असल्याचे दिसत आहे. आखातात तैनात केलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणा काढून त्या तातडीने युक्रेनमध्ये तैनात करण्यावर अमेरिकेचे बायडेन प्रशासन विचार करीत आहे. युक्रेनवरील रशियाचे हवाई हल्ले थोपविण्यासाठी बायडेन प्रशासन हा निर्णय घेईल, असा दावा सदर हवाई सुरक्षा यंत्रणेची निर्मिती करणाऱ्या रेदॉन कंपनीने केला. युक्रेनच्या सुरक्षेसाठी आखाती देशांना ‘असुरक्षित’ बनविण्यासाठी बायडेन प्र्रशासन करीत असलेल्या हालचाली लक्षवेधी ठरतात. अमेरिकेचा आखाती क्षेत्रातील प्रभाव यामुळे बाधित होऊ शकतो.

रशियाबरोबरच्या युद्धामध्ये युक्रेनच्या लष्कराचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. रशियाच्या हवाई हल्ल्यांसमोर युक्रेनची हवाई सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत अमेरिका व नाटोचे सदस्य देश युक्रेनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवित आहेत. पण अमेरिकेची ‘नॅशनल ॲडव्हान्सड् सर्फेस-टू-एअर मिसाईल सिस्टीम्स-एनएएसएएमएस’ (नॅसॅम्स) ही हवाई सुरक्षा यंत्रणा आपल्याला मिळावी, यासाठी युक्रेनने लॉबिंग केल्याचे उघड झाले होते.

पाश्चिमात्य देशांनी युक्रेनसाठी रवाना केलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तुलनेत नॅसॅम्स लांब पल्ल्याच्या अंतरावरील क्षेपणास्त्रांचा माग काढून भेदू शकते, असा दावा केला जातो. त्यामुळे सदर यंत्रणा मिळविण्यासाठी युक्रेनचे प्रयत्न सुरू होते. बुधवारीच अमेरिकेने युक्रेनबरोबर १.२ अब्ज डॉलर्सच्या करारांतर्गत सहा नॅसॅम्स पुरविण्याचा करार केला आहे. रेदॉन कंपनी तयार करीत असलेल्या या नॅसॅम्सचा पुरवठा २०२५ सालापर्यंत पूर्ण होईल, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग हेस यांनी म्हटले आहे. एका हवाई सुरक्षा यंत्रणेच्या निर्मितीला दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे रशियाबरोबर संघर्ष करीत असलेल्या युक्रेनला तातडीने ही यंत्रणा पुरविणे शक्य नसल्याची जाणीव हेस यांनी करून दिली.

हवाई सुरक्षा यंत्रणाअशा परिस्थितीत, अमेरिकेने याआधीच आखाती मित्रदेशांना पुरविलेले हवाई सुरक्षा यंत्रणा काढून ती युक्रेनमध्ये तैनात केली जावी, यावर बायडेन प्रशासन तसेच नाटोचे सहकारी देश विचार करीत असल्याची माहिती हेस यांनी दिली.

पुढील २४ महिन्यांमध्ये अर्थात दोन वर्षानंतर आखाती देशांना सदर हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज केले जाईल, असे हेस पुढे म्हणाले. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. तसेच आखातातील कोणत्या देशांमध्ये ही हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे, याची माहिती देण्यास रेदॉन कंपनीने नकार दिला. पण कतार आणि ओमान या दोन आखाती देशांना अमेरिकेने नॅसॅम्स यंत्रणा पुरविल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे अमेरिका या दोन्ही आखाती देशांमधील सदर हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेईल व युक्रेनमध्ये तैनात करील. असे झाल्यास कतार व ओमान असुरक्षित बनतील, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. याआधीच अमेरिकेने सौदी अरेबिया व युएईमध्ये तैनात केलेली हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेतली होती. तसेच अमेरिकेच्या या दोन्ही जुन्या आखाती मित्रदेशांना शस्त्रसहाय्य पुरविण्यावरही बायडेन प्रशासनाने निर्बंध घातले होते. म्हणूनच इराण व येमेनमधील हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांचा धोका असलेल्या सौदी व युएईने नव्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठी भारत व इस्रायलबरोबर चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

बायडेन प्रशासनाच्या अशा बेताल निर्णयांमुळे अमेरिकेने सौदी व युएईने असे मित्रदेश गमावल्याची टीका झाली होती. अशा परिस्थितीत, कतार व ओमान या देशांमधील हवाई सुरक्षा यंत्रणा काढून बायडेन प्रशासन अमेरिकेचा आखातातील प्रभाव कमी करीत असल्याचे दिसत आहे.

हिंदी

leave a reply