अमेरिकेने पोलंडमध्ये अण्वस्त्रे तैनात करावी

- पोलंडच्या उपपंतप्रधानांचा प्रस्ताव

पोलंडमध्ये अण्वस्त्रेवॉर्सा/वॉशिंग्टन – अमेरिकेने पोलंडमध्ये अण्वस्त्रे तैनात करावीत, असा प्रस्ताव पोलंडचे उपपंतप्रधान जारोस्लाव कॅझिन्स्की यांनी दिला आहे. अण्वस्त्रे तैनात करतानाच अमेरिकेने युरोपातील लष्करी तैनातीत ५० टक्क्यांनी वाढ करावी, अशी मागणीही पोलिश नेत्यांनी केली. दोन वर्षांपूर्वी पोलंडने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला कायमस्वरुपी संरक्षणतळ उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. दोन्ही देशांकडून त्याबाबत चर्चा सुरू असली तरी त्याबाबत ठोस करार झालेला नाही.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाला कडाडून विरोध करणार्‍या देशांमध्ये पोलंड आघाडीवर आहे. रशियन व्यापारावर पूर्ण निर्बंध लादणे व युक्रेनमध्ये शांतीसैनिक पाठविणे यासारख्या कारवायांसाठी पोलंडने आग्रही भूमिका घेतली आहे. युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याची तयारीही पोलंडने दाखविली होती. अण्वस्त्रांसह अतिरिक्त लष्करी तैनातीची मागणी पोलंडच्या आक्रमक रशियाविरोधी धोरणाचा भाग असल्याचे दिसत आहे.

पोलंडमध्ये अण्वस्त्रेपोलंडचे उपपंतप्रधान जारोस्लाव कॅझिन्स्की यांनी, आपला देश अमेरिकेची ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ तैनात करण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने युरोपातील लष्करी तैनाती दीड लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही उपपंतप्रधान कॅझिन्स्की यांनी केली. सध्या अमेरिकेचे एक लाख जवान युरोपात तैनात असून त्यातील पाच हजार जवान पोलंडमध्ये तैनात करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या युरोपातील अण्वस्त्रतैनातीच्या मुद्यावरून यापूर्वी युरोपिय देशांमध्येच वाद निर्माण झाल्याचे समोर आले होते. अधिकृत माहितीनुसार, अमेरिकेने इटलीसह जर्मनी, बेल्जियम, नेदरलॅण्डस् व तुर्कीत अण्वस्त्रे तैनात केली आहेत. मात्र याव्यतिरिक्त इतर काही युरोपिय देशांमधील तळांचा वापरही अण्वस्त्रतैनातीसाठी करण्यात आल्याचे उघड झाले होते. अमेरिकेची युरोपातील अण्वस्त्रतैनाती रशियाच्या नाराजीचे कारण ठरले असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या मागण्यांमध्ये याचा समावेश होता. त्यामुळे पोलंडच्या नव्या मागणीवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.

leave a reply