रेड सीमधील गस्तीसाठी अमेरिकेकडून नव्या पथकाची तैनाती

रेड सीवॉशिंग्टन – ‘रेड सी’च्या क्षेत्रात होणारी तस्करी, चाचेगिरी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेच्या नौदलाने नवी तैनाती जाहीर केली. अमेरिकन नौदलाचे विशेष गस्ती पथक या सागरी क्षेत्रात गस्त घालेल आणि यासाठी शेजारी देशांचे सहकार्य घेईल, असे अमेरिकेच्या नौदलाने घोषित केले. रेड सीच्या क्षेत्रात हौथी बंडखोरांच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने ही तैनाती केल्याचे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. पण रेड सीमधील या नव्या तैनातीची घोषणा करताना अमेरिकेने इराण किंवा इराणसंलग्न हौथी बंडखोरांचा उल्लेख करण्याचे टाळले, याकडे आखाती माध्यमे लक्ष वेधत आहेत.

पर्शियन आखातात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लिटचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल ब्रॅड कूपर यांनी ‘कम्बाईन्ड टास्क फोर्स-१५३’ची घोषणा केली. आखाती आणि आफ्रिकी देशांमधून वाहणार्‍या रेड सी तसेच एडनच्या आखातात ही टास्क फोर्स तैनात केली जाईल, असे व्हाईस ऍडमिरल कूपर यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला अमेरिका या गस्ती पथकाचे नेतृत्व करील व त्यानंतर रेड सीच्या शेजारी देशांकडे या मोहिमेचे नेतृत्व सोपविले जाईल, अशी घोषणा कूपर यांनी केली.

‘या टास्क फोर्समध्ये दोन ते आठ गस्ती जहाजांचा समावेश असेल. शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, कोळसा आणि मानवी तस्करी करणार्‍यांवर ही टास्क फोर्स कारवाई करील’, अशी माहिती व्हाईस ऍडमिरल कूपर यांनी दिली. अमेरिकेची ‘युएसएस माऊंट व्हिटनी’ या पथकाचे नेतृत्व करणार आहे. रेड सीचे क्षेत्र धोरणात्मकदृष्ट्यात अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून कूपर यांनी या टास्क फोर्सच्या तैनातीचे समर्थन केले. अमेरिकन नौदलाच्या या लष्करी मोहिमेत इजिप्त सहभागी होईल, असे संकेत कूपर यांनी दिले. याशिवाय इतर कुठल्याही देशाचे नाव घेण्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांनी टाळले.

रेड सीत्याचबरोबर रेड सी ते एडनच्या आखातातील ही तैनाती येमेनधील हौथी बंडखोरांविरोधी आहे का, या प्रश्‍नावर उत्तर देण्याचे कूपर यांनी टाळले. अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांना माध्यमांनी चार वेळा यासंबंधी प्रश्‍न केला. पण प्रत्येकवेळी कूपर यांनी इराण किंवा इराणसंलग्न हौथी बंडखोरांचा उल्लेख करण्याचे टाळले, याकडे आखाती माध्यमे लक्ष वेधत आहेत.

रेड सी व एडनच्या आखाताच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या आंतरराष्ट्रीय जहाजांची सुरक्षा हा अतिशय चिंतेचा विषय ठरत आहे. या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इस्रायल, सौदी अरेबिया व युएईच्या जहाजांवर रॉकेट हल्ले झाल्याचे याआधी समोर आले होते. काही दिवसांपूर्वी मानवतावादी सहाय्य घेऊन प्रवास करणार्‍या युएईच्या जहाजावर हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला होता.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी हौथी बंडखोरांनी सौदी व युएईच्या थेट राजधानीवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. पण पर्शियन आखात ते रेड सीपर्यंतच्या व्यापारी वाहतूक धोक्यात टाकणार्‍या हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केली आहे. यामुळे सौदी, युएई व अरब देश अमेरिकेवर नाराज झाल्याचा दावा केला जातो. आत्ताही अमेरिकेने रेड सीसाठी स्वतंत्र गस्तीपथकची घोषणा केल्यानंतरही यावर सौदी व अरब देशांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अमेरिकेची ही तैनाती येमेनमधील हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांचे लक्ष ठरणार्‍या सौदी व अरब देशांच्या सुरक्षेसाठी नसल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply