भारतातून गहू आयातीस इजिप्तची मान्यता 

- वाणिज्यमंत्री पियूष गोयल

नवी दिल्ली – ‘भारतीय शेतकरी संपूर्ण जगाला अन्न पुरवित आहेत. विश्‍वासू खाद्यान्न पुरवठादार म्हणून भारत उदयाला येत आहे. आपले शेतकरी देशाची धान्यकोठारे भरून वाहतील याची काळजी घेत असून भारत जगाला अन्न वाढण्यास तयार झाला आहे’, अशा शब्दात वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी इजिप्त भारतातून गहू आयात करण्यास तयार झाल्याची माहिती दिली.

पियूष गोयलरशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकले आहे. पण या युद्धामुळे संपूर्ण जगासमोर खाद्यान्नाचे मोठे संकट निर्माण केले आहे. रशिया आणि युक्रेनसह संपूर्ण ब्लॅक सी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गहू पिकतो व हे देश जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार देश आहेत. मात्र या युद्धामुळे या क्षेत्रातून जागतिक बाजारपेठेत होणारा गहू पुरवठा थांबल्याने मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे गहू आयातदार देश हे इतर पर्यायांचा विचार करीत आहेत व भारत हा पर्याय म्हणून समोर आला आहे.

भारतातून गहू आयात करण्यासंदर्भात कित्येक देश भारताबरोबर चर्चा करीत असल्याच्या बातम्या गेल्या महिनाभरात आल्या होत्या. यामध्ये इजिप्तचेही नाव होते. इजिप्तने वाटाघाटीसाठी आपले शिष्टमंडळही यासाठी भारतात पाठविल्याच्या बातम्या होत्या. इजिप्त हा जगातील सर्वाधिक गहू आयात करणारा देश आहे. इजिप्त आपल्या सहा कोटी जनतेच्या गव्हाची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रशिया व युक्रेनवर अवलंबून होता. इजिप्तने गेल्यावर्षी रशियातून १.८ अब्ज डॉलर्सचा गहू आयात केला होता, तर युक्रेनमधून ६१ कोटी डॉलर्सची गहू खरेदी केली होती.

इजिप्त आपली गहू खरेदी आपल्या देशाच्या जनरल ऍथॉरिटी फॉर सप्लाय कमोडिटीच्या (जीएएससी) माध्यमातून करतो. ‘जीएएससी’च्या यादीत गहू पुरवठादार म्हणून रशिया, युक्रेन व्यतिरिक्त जर्मन, अमेरिका, फ्रान्स आणि लाटविया या देशाचा समावेश आहे. या यादीत आता भारतही आला आहे. इजिप्तने भारताला आपला गहू आयातदार म्हणून मान्यता दिली आहे. वाणिज्यमंत्र्यांनीच याबाबतची घोषणा केली.

मार्च महिन्यात दुबईत झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटदरम्यान भारताचे वाणिज्यमंत्री गोयल आणि इजिप्तच्या अर्थमंत्र्यांची चर्चा झाली होती. या चर्चेनंतर इजिप्तने भारतातून गहू आयातीचे फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी व वाटाघाटीसाठी शिष्टमंडळ पाठविले होते. आता इजिप्त भारतातून गहू आयातीसाठी तयार झाला आहे.

भारताची यावर्षीची गहू व इतर अन्नधान्यांची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भारताने यावर्षी कृषी क्षेत्रातून ५० अब्जापेक्षा जास्तची निर्यात केली आहे. तर चालू आर्थिक वर्षात ही निर्यात १०० अब्जावर पोहोचेल असा विश्‍वास व्यक्त केला जातो. भारताची गहू निर्यातही मार्चमध्ये संपलेल्या वर्षात ७० लाख टन होती. ही निर्यात चालू वर्षात १५० लाख टनावर जाईल, असा विश्‍वास गोयल यांनी इजिप्तने भारताला दिलेल्या मान्यतेनंतर व्यक्त केला.

leave a reply