अमेरिकेने सिरियात ड्रोन हल्ल्याद्वारे अल कायदाच्या कमांडरला ठार केले

कमांडरला ठारसना – सिरियाच्या इदलिब प्रांतात चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाच्या वरिष्ठ कमांडरला ठार केल्याचे अमेरिकेने जाहीर केले. अल कायदाच्या कमांडरवर ‘कायनेटिक काऊंटरटेररिझम स्ट्राईक’ केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात सिरियाच्या पूर्वेकडील सीमेजवळ इराणसंलग्न दहशतवादी गटाच्या वाहनांवर हवाई हल्ले झाले होते. या हल्ल्यांसाठी अमेरिका जबाबदार असल्याचे आरोप झाले होते.

सिरियाच्या वायव्येकडील इदलिब प्रांतात एका वाहनावर अमेरिकेने ड्रोन हल्ला चढविल्याची माहिती सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कर्नल वेन मॅरोटो यांनी दिली. या हल्ल्यात मोटारीचे दोन तुकडे झाल्याचे सिरियन मानवाधिकार संघटनेने स्पष्ट केले. या हल्ल्यासाठी अमेरिकेने कुठल्या ड्रोनचा वापर केला होता, याची माहिती कर्नल वेन यांनी दिली नाही. पण हा हल्ला अचूक होता व यात अल कायदाचा दहशतवादी वगळता दुसर्‍या कुणाचीही जीवितहानी झाली नसल्याचे कर्नल वेन यांनी सांगितले.

याआधी अमेरिकेने इदलिबमध्ये केलेल्या कारवाईत आयएसचा प्रमुख अबु बक्र अल-बगदादी याला ठार केल्याचा दावा केला होता. इदलिबमधील काही भाग अजूनही अल कायदासंलग्न ‘हयात तहरिर अल-शाम’ व इतर दहशतवादी टोळ्यांच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, इदलिबसह सिरियातील छोटे-मोठे दहशतवादी गट अफगाणिस्तानातील तालिबानचे अनुकरण करून मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी याआधी दिला होता.

leave a reply