अमेरिका व युरोपिय देशांकडून दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणण्याचे प्रयत्न

- रशियन शस्त्रपुरवठ्याचा दावा करणाऱ्या अमेरिकी राजदूताने माफी मागितली

जोहान्सबर्ग/वॉशिंग्टन/बर्लिन – रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचे समर्थन न करणाऱ्या तसेच त्याला सहाय्य न करणाऱ्या देशांवर दडपण आणण्याचे प्रयत्न अमेरिका व युरोपिय देशांनी सुरू केले आहेत. गेल्या २४ तासात ‘ब्रिक्स’ गटाचा भाग असलेल्या व रशियाबरोबरील सहकार्य कायम राखणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या दक्षिण आफ्रिकेतील राजदूतांनी हा देश रशियाला शस्त्रपुरवठा करीत असल्याचा आरोप केला. दक्षिण आफ्रिका सरकारने आक्रमक भूमिका घेत आरोप फेटाळल्याने अमेरिकी राजदूतांना माफी मागणे भाग पडले. मात्र माफीचे वृत्त समोर येत असतानाच जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाच्या मुद्यावरून दक्षिण आफ्रिकेला इशारा दिल्याचे समोर येत आहे.

अमेरिका व युरोपिय देशांकडून दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणण्याचे प्रयत्न - रशियन शस्त्रपुरवठ्याचा दावा करणाऱ्या अमेरिकी राजदूताने माफी मागितलीगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘लेडी आर.’ नावाचे रशियन जहाज दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन बंदरात दाखल झाले होते. या जहाजातून दक्षिण आफ्रिकेने रशियाला शस्त्रास्त्रे पाठविल्याचा आरोप अमेरिकेचे राजदूत रुबेन ब्रिगेटी यांनी केला. अमेरिकी राजदूतांच्या या आरोपांवर दक्षिण आफ्रिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ब्रिगेटी यांना समन्स पाठवून योग्य ती समज दिली. त्यानंतर ब्रिगेटी यांनी आपल्या विधानांमुळे झालेल्या गैरसमजाबद्दल माफी मागत असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले. या मुद्यावरून दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडताना अमेरिका-रशिया वादात उगाच आम्हाला खेचण्याचा प्रयत्न करू नका, असे सुनावल्याचे समोर आले आहे.

अमेरिकी राजदूतांची माफी व दक्षिण आफ्रिका सरकारचे आक्रमक वक्तव्य समोर येत असतानाच जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालेना बेअरबॉक यांनी दक्षिण आफ्रिकेला इशारा दिला. अमेरिका व युरोपिय देशांकडून दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणण्याचे प्रयत्न - रशियन शस्त्रपुरवठ्याचा दावा करणाऱ्या अमेरिकी राजदूताने माफी मागितलीदक्षिण आफ्रिकेने रशियाला केलेल्या शस्त्रपुरवठ्याबाबत अमेरिकेने केलेले आरोप जर्मनी गांभीर्याने घेत असून इतर देशांशी या मुद्यावर चर्चा करीत असल्याचे बेअरबॉक यांनी सांगितले. अमेरिकी राजदूतांच्या माफीनंतरही जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी दक्षिण आफ्रिकेला सुनावण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना महत्त्वाची ठरते.

गेल्या काही वर्षात दक्षिण आफ्रिकेने रशिया व चीनसह आशियाई देशांबरोबरील सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. दक्षिण आफ्रिका हा ‘ब्रिक्स’ या गटाचा सदस्य असून येत्या काही महिन्यात या गटाची बैठक दक्षिण आफ्रिकेत संपन्न होणार आहे. या बैठकीत ‘ब्रिक्स’कडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, असे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका व जर्मनीने दक्षिण आफ्रिकेवर एकापाठोपाठ आरोप करणे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. यापूर्वीही अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या नौदल सरावावरून या देशाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.

हिंदी

 

leave a reply