अमेरिकेने ‘अल कायदा’चा दहशतवादी भारताला सोपविला

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –  ‘अल कायदा’च्या एका बड्या दहशतवाद्याला अमेरिकेने भारताच्या हवाली केले आहे. अमेरिकन न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला  मोहम्मद इब्राहिम झुबेर याला १९ मे रोजी कडेकोट बंदोबस्तात भारतात आणण्यात आले. ‘अल कायदा’चा कुख्यात दहशतवादी अल-अवलाकी याचा जवळचा साथीदार असलेल्या झुबेरकडून भारतीय यंत्रणांना महत्वाची माहिती मिळू शकते, असा दावा केला जातो. तसेच  झुबेरला भारतीय यंत्रणांकडे सोपवून अमेरिकेने भारताबरोबरील आपले दहशतवादविरोधी सहकार्य अधिकच व्यापक बनल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला आहे. 

झुबेरला २०११ साली अमेरिकी यंत्रणांनी त्यांच्या भावासह अटक केली होती. झुबेर सध्या अमेरिकी नागरिक असला तो मूळचा हैदराबाद येथील रहिवाशी होता. २००२ साली त्याने अमेरिकेतील ओहिओ विद्यापीठात इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, तर २००४ साली त्याने युनियटेड अरब अमिरातीचे  (युएई) नागरिकत्व घेतले. तसेच २००८ साली त्याने एका अमेरिकी युवतीशी लग्न करून अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. मात्र झुबेर अल कायदासाठी काम करीत होता. झुबेर आणि त्याचा भाऊ याह्या मोहमद हे दोघे अल कायदाच्या अल अलकावी या येमेनी दहशतवाद्यांचे  जवळचे साथीदार होते. झुबेर अल कायदासाठी पैशांच्या पुरवठयाची जबाबदारी पाहत होता अशी माहिती समोर येत आहे. 

झुबेरचा भाऊ सध्या अमेरिकेच्या कारागृहात २७ वर्षांची शिक्षा भोगत असून तर झुबेरला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.  शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला अमेरिकेने भारताच्या हवाली केले आहे. काही वर्षांपूर्वी अल कायदाने भारत आणि भारतीय उपखंडात कारवायांसाठी स्वतंत्र संघटना बनविली होती. त्यानंतर भारतात अल कायदाशी संबंध ठेवणाऱ्या काही संघटनांचे जाळे उद्वस्थ करण्यात भारतीय यंत्रणांना यश मिळाले होते. अल कायदा भारतात मोठे हल्ले घडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असल्याच्या इशारे गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर झुबेरचा ताबा भारतीय यंत्रणांना मिळाला आहे.

भारतातील दहशतवादी हल्ल्यात झुबेरचा समावेश होता का, याची चौकशी करण्यात येणार असून अल कायदाच्या भारत आणि भारतीय उपखंडातील हालचालींबाबतही झुबेरच्या चौकशीत महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. 

leave a reply