वॉशिंग्टन – इराण तसेच सिरियाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी सौदी अरेबियाने उचललेल्या पावलांमुळे अमेरिका कोंडीत सापडली आहे. हे सारे लक्षात घेण्यात अमेरिका अपयशी ठरली, अशी निराशा अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी व्यक्त केली. याबाबत सौदीने आपल्याला अंधारात ठेवल्याची नाराजीही बर्न्स यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली.
काही दिवसांपूर्वी ‘सीआयए’चे प्रमुख बर्न्स यांनी सौदी अरेबियाचा तातडीचा दौरा केला होता. यावेळी बर्न्स यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. सौदी व इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची चीनमध्ये भेट होण्याआधी बर्न्स यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सबरोबर चर्चा केल्याचा दावा अमेरिकेतील वर्तमानपत्राने केला आहे.
गेल्या महिन्यात चीनच्या मध्यस्थीने सौदी व इराणमध्ये संबंध सुरळीत करण्यासाठी 2016 सालानंतर पहिल्यांदाच थेट बैठक पार पडली. याच भेटीत दूतावास सुरू करण्यावर तसेच राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्याबाबत चर्चा झाली होती. एकमेकांचे शत्रू असलेल्या या दोन्ही इंधनसंपन्न देशांमध्ये समेट घडवून चीनने आखातातील अमेरिकेचा प्रभाव संपविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचा इशारा अमेरिकेतील विश्लेषकांनी दिला होता.
याच काळात सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी सौदीचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली होती. अवघ्या काही दिवसात सौदीने इराण व सिरियाबरोबर संबंध सुधारण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबाबत आपल्याला अंधारात ठेवले गेले, असे सीआयएचे प्रमुक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीआयएच्या प्रमुखांनी सौदीचा दौरा केला. यावेळी सौदीला गोपनीय माहिती पुरविण्याचे बर्न्स यांनी जाहीर केले.
तसेच लष्करी आघाडीवरही अमेरिका सौदीच्या पाठिशी असल्याची घोषणा सीआयएच्या प्रमुखांनी केली, अशी माहिती अमेरिकी वर्तमानपत्राने दिली. तसेच इराण व सिरियाशी संबंध सुधारण्यासाठी सौदीने सुरू केलेल्या प्रयत्नांबाबत जाणून घेण्यात अमेरिका अपयशी ठरल्याची कबुली बर्न्स यांनी दिली.
सीआयएप्रमुखांच्या दाव्यानुसार सौदी अरेबियाने इराणबरोबरील चर्चेची माहिती दिली नसली, तरी अमेरिकेचे ख्यातनाम विश्लेषक, माजी लष्करी अधिकारी फार आधीपासून बायडेन प्रशासनाला याबाबत सावध करीत होते. चीन आखातातील आपला प्रभाव वाढवून अमेरिकेच्या हितसंबंधांना आव्हान देत असल्याचे या सर्वांनी बजावले होते. इतकेच नाही तर बायडेन प्रशासनाच्या बेताल धोरणांमुळे इस्रायल व सौदी अरेबियासह तर आखाती देश देखील अमेरिकेच्या विरोधात जाऊ लागल्याचे अमेरिकन विश्लेषक सातत्याने सांगत आले आहेत. बायडेन प्रशासन जाणीवपूर्वक या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रारही अमेरिकन विश्लेषक व पत्रकारांनी केली होती.
हिंदी