युक्रेनच्या ड्रोनहल्ल्यावरून रशियाचा तुर्कीला इशारा

तुर्कीला इशारामॉस्को/अंकारा/किव्ह – युक्रेनला ड्रोन्स पुरविल्याने पूर्व युक्रेनमधील समस्या सुटणार नाही, याची तुर्कीने जाणीव ठेवावी असा सज्जड इशारा रशियाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने तुर्की ड्रोनचा वापर करून पूर्व युक्रेनमधील बंडखोरांवर हल्ला केल्याचे समोर आले होते. युक्रेनच्या या हल्ल्याने रशिया भडकला असून ड्रोन पुरविणार्‍या तुर्कीला इशारा दिला आहे. यापूर्वीही रशियाने युक्रेनबरोबरील लष्करी सहकार्याच्या मुद्यावर आक्रमक शब्दात बजावले होते. तरीही तुर्कीने आपली भूमिका बदलली नसल्याने रशियाकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

युक्रेनच्या संरक्षणदलाने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत तुर्कीने दिलेल्या ‘बेरक्तर टीबी२ कॉम्बॅट ड्रोन’च्या सहाय्याने पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांवर केलेला हल्ला दाखविण्यात आला होता. या हल्ल्यात गाईड बॉम्बचा वापर करून रशिया समर्थक बंडखोरांकडील ‘आर्टिलरी युनिट’ उडवून दिले. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील विश्‍लेषकांनी तुर्कीची ड्रोन्स ‘गेमचेंजर’ ठरु शकतात, असे दावे करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी तुर्कीला सुनावले आहे.

‘युक्रेनच्या संरक्षणदलांना ड्रोन दिल्यानंतर त्यांनी पूर्व युक्रेनमध्ये त्याचा वापर सुरू केला आहे. या तैनातीमुळे पूर्व युक्रेनमधील अस्थैर्य अधिकच वाढू शकते. ड्रोन्समुळे पूर्व युक्रेनमधील समस्या सुटण्यास मदत होणार नाही. आमचे तुर्कीबरोबरील संबंध चांगले असली तरी पूर्व युक्रेनच्या बाबतीत रशियाला वाटणारी चिंता खरी ठरत असल्याचे दिसते. युक्रेनच्या लष्कराच्या हाती तुर्की ड्रोन आल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत आहे’, अशा शब्दात रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी तुर्कीला बजावले.

गेल्या काही वर्षांपासून तुर्कीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची धडपड सुरू आहे. त्या अनुषंगाने राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अनेक आक्रमक पावले उचलली असून युक्रेनबरोबरील लष्करी सहकार्य हादेखील त्याचाच भाग मानला जातो. एका बाजूला सिरिया व लिबियातील संघर्ष तसेच संरक्षणक्षेत्रात रशियाबरोबरील सहकार्य भक्कम करीत असतानाच, तुर्कीने युक्रेनबरोबर संबंध वाढविण्याच्याही हालचाली सुरू केल्या होत्या. २०१९ साली तुर्कीने युक्रेनला केलेली ड्रोन्सची विक्री हे त्याचे ठळक उदाहरण मानले जाते.

सुमारे सात कोटी डॉलर्सच्या या करारानुसार, तुर्की युक्रेनला सहा ‘बेरक्तर टीबी२ कॉम्बॅट ड्रोन्स’ व शस्त्रे पुरविणार आहे. त्यातील पहिले ड्रोन युक्रेनच्या संरक्षणदलाला देण्यात आले असून ते पूर्व युक्रेननजिक तैनात करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तुर्कीला इशारात्यानंतर गेल्या वर्षी तुर्कीने युक्रेनबरोबर लष्करी सहकार्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यावेळी, ब्लॅक सी क्षेत्रात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी युक्रेन महत्त्वाचा देश असल्याचे वक्तव्य तुर्की राष्ट्राध्यक्षांनी केले होते. त्याचवेळी क्रिमिआवर बेकायदा ताबा मिळविण्याच्या कृत्याला तुर्कीने कधीही समर्थन दिलेले नव्हते व देणार नाही, असे खळबळजनक वक्तव्यही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केले होते. एप्रिल महिन्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तुर्की दौर्‍यावर आले असतानाही एर्दोगन यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. त्याचवेळी युक्रेनची अखंडता व सार्वभौमत्त्वाला तुर्कीचा पाठिंबा असेल, असेही म्हटले होते.

तुर्कीची युक्रेनबाबतची ही भूमिका व वाढती जवळीक रशियाला चांगलीच खटकत होती. क्रिमिआच्या मुद्यावरून रशियाने अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांना उघड आव्हान दिले असताना तुर्कीने त्यांना साथ दिल्याने रशिया तुर्कीवर चांगलाच नाराज आहे. ‘क्रिमिआविरोधात युक्रेन सरकारच्या कारवायांना प्रोत्साहन देणे हे रशियाच्या क्षेत्रिय एकात्मतेवरील आक्रमण ठरते. याबाबत रशियाला वाटणारी चिंता लक्षात घेऊन तुर्की आपल्या भूमिकेबाबत आवश्यक तडजोड करेल, अशी आम्हाला आशा आहे’, अशा खरमरीत शब्दात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी तुर्कीला यापूर्वी इशारा दिला होता.

एकीकडे अमेरिकेच्या विरोधात जाऊन रशियाकडून ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करणारा तुर्की, दुसर्‍या बाजूला रशियाच्या हितसंबंधांना आव्हान देणार्‍या कारवाया करीत आहे. यामुळे तुर्कीच्या धोरणाबाबत संदिग्धता कायम राहिली आहे. रशियाही तुर्कीकडे सावधपणे पाहत असल्याचे पेस्कोव्ह यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होत आहे.

leave a reply