अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’च्या लष्करी गुप्तचर प्रमुखांची तैवानला भेट

- प्रगत अमेरिकी विनाशिका ‘साऊथ चायना सी’मध्ये दाखल

तैपेई/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’मध्ये ‘मिलिटरी इंटेलिजन्स’चे प्रमुख असणाऱ्या रिअर ॲडमिरल मायकल स्टडमॅन यांनी तैवानला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे. तैवानी सूत्रांनी या भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनकडून तैवानवर हल्ला करण्याबाबत सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्या, त्यासाठी वाढविलेली संरक्षण तैनाती आणि चिनी विमाने व जहाजांकडून सुरू असणारी घुसखोरी या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने दिलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

गेल्या वर्षभरात अमेरिकेने तैवानबरोबरील राजनैतिक व संरक्षण सहकार्य प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या चार महिन्यात तैवानचा दौरा केला आहे. त्यापाठोपाठ अमेरिका व तैवानमध्ये आर्थिक तसेच गुंतवणूक क्षेत्रात महत्त्वाचे करारही झाले आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिका व तैवानमध्ये ‘इकॉनॉमिक प्रॉस्परिटी पार्टनरशिप डायलॉग’लाही सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या संसदेत तैवानच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून व्यापारी कराराचीही मागणी जोर धरत आहे.

त्याचवेळी चीनविरोधातील संरक्षणसज्जतेसाठी अमेरिकेने तैवानला ‘एफ-16’ लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो, रॉकेट सिस्टिम्स पुरविण्याचीही तयारी केली आहे. अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी ‘एफ-35’सारखी प्रगत लढाऊ विमाने तैवानसाठी ‘स्टँडबाय’ ठेवावी किंवा थेट तैनात करावीत, असे आवाहनही केले होते. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ यांचा तैवाननजिकचा वावरही वाढला आहे. अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी तैवानमध्ये ‘लँडिंग’ केल्याचे दावेही प्रसिद्ध झाले आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करता ‘इंडो-पॅसिफिक कमांड’मध्ये गुप्तचर यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या रिअर ॲडमिरल मायकल स्टडमॅन यांनी तैवानला तातडीची व अघोषित भेट देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकतीच तैवान हा चीनचा भाग नाही, असे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. हे वक्तव्य करतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेली मोहीम अद्याप संपली नसल्याचेही पॉम्पिओ यांनी बजावले होते. त्याचवेळी अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांनंतर सत्ताबदल होण्याचे संकेत आहेत. या धामधुमीत चीन तैवानची कुरापत काढण्याचा प्रयत्न करू शकेल, असे भाकित यापूर्वीच वर्तविण्यात आले होतेे.

दरम्यान, अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस बॅरी’ साऊथ चायना सी क्षेत्रात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या ‘मिसाईल गायडेड डिस्ट्रॉयर’ प्रकारातील या विनाशिकेने नुकताच तैवाननजिकच्या क्षेत्रातून प्रवास केल्याची माहितीही अमेरिकी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

leave a reply