‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीवर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचा सहभाग

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

Nord Streamमॉस्को – रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांमध्ये अमेरिकेचा थेट सहभाग असल्याचा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. लॅव्हरोव्ह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केले. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम’मध्ये झालेल्या घातपातावर संसदेत प्रतिक्रिया दिली होती.

getty-Nord Stream‘नॉर्ड स्ट्रीम 1’ ही रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी आहे. मात्र गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या इंधनवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करण्यात आला होता. युरोपिय देशांनी निर्बंध उठविले तरच पुरवठा सुरू करु, अशी आक्रमक भूमिका रशियाने घेतली होती. तर ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनी बांधून तयार असली तरी नव्या जर्मन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यातून पुरवठा सुरू झालेला नव्हता. इंधनपुरवठा बंद असतानाही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस इंधनवायूची गळती होण्याची घटना घडल्या होत्या.

US involved in attackत्यानंतर ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पाश्चिमात्य देशांनी रशियावर आरोप केले होते. मात्र रशियाने आपल्यावरील आरोप फेटाळले होते. सप्टेंबर महिन्यात ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीत घडविण्यात आलेला स्फोट हे ब्रिटन व अमेरिकेचे कारस्थान असल्याचा आरोप रशियन प्रवक्त्यांनी केला होता. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेकडे ब्रिटनचे लष्करी तज्ज्ञ हल्ल्यासाठी सूचना देत असल्याचे पुरावे असल्याचे दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही सदर स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे सांगून त्यामागे ब्रिटीश यंत्रणा असल्याचा दावा केला होता. रशियाच्या परराष्ट्र विभागाने घातपात झालेले भाग नाटो सदस्य देशांचे असून त्यांच्यावर अमेरिकेचे नियंत्रण असल्याकडे लक्ष वेधले होते. युरोपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले तर त्यात अमेरिकेलाही संशयित म्हणून सामील करावे, अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती.

leave a reply