पेरूमधील सरकारविरोधी निदर्शनांचा चीनला फटका

- चीनच्या मालकीच्या तांब्याच्या खाणीतील कामकाज ठप्प पडण्याच्या मार्गावर

लिमा, दि. २ (वृत्तसंस्था) – गेल्या दोन महिन्यांपासून लॅटीन अमेरिकेतील पेरू या देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांचा फटका चीनला बसला आहे. चीनने मालकी घेतलेल्या तांब्याच्या खाणीतील कामकाज या निदर्शनांमुळे बंद ठेवावे लागणार आहे. चीनच्या पेरूमधील गुंतवणुकीसाठी हा हादरा ठरतो. या बातमीनंतर हाँगकाँगच्या शेअर बाजारातील सदर चिनी कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये चीनने खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या लॅटीन अमेरिकेतील देशांबरोबर मुक्त व्यापारी करार केले आहेत. चांदी, तांबे, झिंक आणि कथिल यांच्या खाणी असलेल्या पेरू सोबत देखील चीनने करार केलेले आहेत. तांब्याची सर्वाधिक निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये पेरू दहाव्या स्थानावर आहे. चीनच्या मिनमेटल्स कॉर्पोरेशन या कंपनीने ‘लास बंबास’ या तांब्याच्या खाणीची मालकी घेतल्यानंतर २०१६ सालापासून त्यातून तांब्याचे उत्खनन सुरू केले होते.

या खाणीतून नेमके किती टन तांब्याचे उत्खनन केले जाते, याचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. पण दर वर्षी चार लाख टन इतक्या प्रमाणात तांब्याचे उत्खनन इथून होऊ शकते, असा दावा केला जातो. त्यामुळे चीन लास बंबास खाणीतून मोठ्या प्रमाणात तांबे मिळवित असल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लास बंबास खाणीला पेरूमधील अस्थैर्याचा फटका बसला आहे.
गेल्या वर्षी स्थानिकांच्या जोरदार विरोधामुळे लास बंबास खाणीचे कामकाज ५० दिवसांसाठी बंद ठेवावे लागले होते. तर गेल्या दोन महिन्यांपासून पेरूतील विद्यमान सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे पुन्हा एकदा लास बंबास खाण बंद करण्याचे संकट ओढावल्याचा दावा केला जातो. सत्तेतून बेदखल केलेले माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅसिलो यांचे समर्थक पेरूच्या शहरांमध्ये हिंसक निदर्शने करीत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या निदर्शनांमुळे वाहतूक प्रभावित झाली आहे. काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लास बंबास खाण असलेल्या भागातही मोठी जाळपोळ झाली असून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे खाणीतील कामकाजासाठी आवश्यक साठा पोहोचू शकलेला नाही. या कारणास्तव लास बंबास खाण बंद करावी लागत असल्याची माहिती चीनच्या कंपनीने दिली आहे.

leave a reply