रशियाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांसाठी अमेरिका हा मुख्य धोका

-राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

Russia-maritime-interestsमॉस्को – अमेरिका हा रशियाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांसाठी मुख्य धोका असल्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रविवारी रशियात राष्ट्रीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या एका समारंभात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाचे नवे नौदल धोरण जाहीर केले. यात अमेरिकेचा मुख्य धोका म्हणून उल्लेख करतानाच नाटोच्या रशियन सीमेनजिक सुरू असणाऱ्या हालचालींचाही उल्लेख करण्यात आला.

रशियन सम्राट ‘झार पीटर द ग्रेट’ याने उभारलेल्या रशियन नौदलाचा स्थापना दिवस ‘नेव्ही डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सेंट पीटर्सबर्ग शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुतिन यांनी, ‘झार पीटर द ग्रेट’ याने रशियाला जागतिक स्तरावरील सामर्थ्यशाली नौदल म्हणून आकारास आणल्याचा उल्लेख केला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी रशियाचे नवे ‘नेव्हल डॉक्ट्राईन’ही जाहीर केले. ‘अमेरिकेच्या सामरिक धोरणात जगभरातील महासागरांवर वर्चस्व मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही बाब रशियाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांसाठी सर्वात मोठा धोका ठरतो’, असा इशारा पुतिन यांनी यावेळी दिला.

putin-speechरशिया ही जगातील सर्वात प्रबळ नाविक शक्ती बनावी म्हणून प्रयत्न करण्यात येतील, असा दावा रशियाच्या ‘नेव्हल डॉक्ट्राईन’मध्ये करण्यात आला. यात आर्क्टिक महासागरापासून ते ब्लॅक सीपर्यंत रशियन नौदल आपले सामर्थ्य वाढवेल, असेही सांगण्यात आले. यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ‘झिरकॉन’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे लवकरच रशियन नौदलात सामील होत असल्याचेही जाहीर केले. ही क्षेपणास्त्रे रशियन नौदलाची क्षमता वाढवतील व रशियाच्या सार्वभौमत्वाविरोधातील कोणत्याही धोक्याला रशियन नौदल वीजेच्या वेगाने प्रत्युत्तर देईल, असा इशाराही पुतिन यांनी यावेळी दिला.

leave a reply