अमेरिका-इस्रायलचा रेड सीमध्ये युद्धसराव

युद्धसरावमनामा – मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची आवागमन सुरू असलेल्या रेड सीच्या सागरी क्षेत्रात अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाचा संयुक्त युद्धसराव नुकताच पार पडला. अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लिट’मधील युद्धनौका आणि इस्रायली विनाशिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘रेड सी’मधील इंधन तसेच मालवाहू जहाजांची सुरक्षा, दहशतवाद आणि चाचेगिरीविरोधी कारवाईचा सराव यावेळी करण्यात आला.

युरोप व आखाती देशांना जोडणाऱ्या रेड सीच्या सागरी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात इंधन व मालवाहतूक केली जाते. या सागरी क्षेत्रातून प्रतिदिनी जवळपास शंभर जहाजे प्रवास करतात. व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेला सोमालियन चाचे तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून धोका असल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर, अमेरिका व मित्रदेशांकडून या क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन केले जाते.

गेल्या वर्षभरात अमेरिका आणि इस्रायलच्या संरक्षणदलांमधील सरावांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उभय देशांच्या नौदलाने रेड सीच्या क्षेत्रात सराव केला व यात युएई व बाहरिन या अरब देशांच्या विनाशिका देखील सहभागी झाल्या होत्या. रेड सीच्या क्षेत्रात इराणने इस्रायलच्या जहाजावर केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून सदर सरावाचे आयोजन करण्यात आला होते. तर काही महिन्यांपूर्वीच अमेरिका व इस्रायलच्या लढाऊ विमानांनी रेड सीच्या हवाई क्षेत्रात सराव केला होता. यामध्ये अरब देशांची लढाऊ विमाने देखील सहभागी झाली होती.

leave a reply