अमेरिका, युरोप अणुकरारावर वाटाघाटीसाठी प्रयत्न करीत असताना इराणने नातांझ प्रकल्पात नवे सेंट्रिफ्यूिजेस इन्स्टॉल केले

नातांझतेहरान – इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी व्हिएन्ना येथे झालेल्या वाटाघाटींना यश मिळाले नव्हते. पण आता व्हिएन्ना येथेच नव्याने वाटाघाटी सुरू करण्यासाठी अमेरिका व युरोपिय महासंघाने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच अमेरिका व महासंघाचे प्रतिनिधी व्हिएन्नामध्ये दाखल होतील. याबाबत बातम्या येत असतानाच, इराणने नातांझ अणुप्रकल्पात सेंट्रिफ्यूिजेसचे नवे कॅस्केड बसविण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. याआधीच इराणच्या अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूिजेसची वाढती संख्या चिंतेचा विषय बनल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने म्हटले होते.

नातांझइराणच्या ‘नूर न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अणुऊर्जा संस्थेने नातांझ येथील अहमदी रोशन प्रकल्पात ‘आयआर-१’ आणि ‘आयआर-६’ प्रकारातील सेंट्रिफ्यूिजेस बसविण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पातील बेसमेंटमध्ये ही कारवाई सुरू असून या प्रकल्पाला सुरक्षा पुरविण्यात आल्याचेही माहिती इराणी वृत्तसंस्थेने दिली. दोन दिवसांपूर्वी इराणच्या अणुऊर्जा संस्थेने इराणच्या अणुप्रकल्पात शेकडो सेंट्रिफ्यूिजेस कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध टाकले होते. त्यांना उत्तर म्हणून हे सेंट्रिफ्यूिजेस कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता, असे अणुऊर्जा संस्थेने स्पष्ट केले. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी देखील नातांझ प्रकल्पातील सेंट्रिफ्यूिजेसचे इन्स्टॉलेशन अमेरिकेला उत्तर असल्याचे जाहीर केले होते.

नातांझइराणच्या या हालचाली करीत असताना अमेरिका व युरोपिय महासंघाने २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी नव्याने प्रयत्न करीत असल्याची घोषणा केली. व्हिएन्ना येथील वाटाघाटीत महासंघाचे प्रतिनिधीत्व करणारे एन्रीक मोरा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबरच्या वाटाघाटीसाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉब मॅली देखील येत्या काही तासात व्हिएन्ना येथे दाखल होणार आहेत. यामुळे इराणच्या या हालचालीनंतरही बायडेन प्रशासन इराणबरोबरच्या वाटाघाटीसाठी उत्सूक असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच इराणने बायडेन प्रशासन अणुकराराबाबत प्रामाणिक नसल्याचा आरोप केला होता. तसेच इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान व साहित्य असल्याचा इशारा इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. इस्रायलने इराणच्या या घोषणेकडे लक्ष वेधून पाश्चिमात्य इराणबरोबर करीत असलेल्या अणुकराराशी आपण बांधिल नसल्याचे जाहीर केले होते. तसेच आवश्यकता भासल्यास इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ला चढविण्याची क्षमता इस्रायलकडे असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले होते.

leave a reply