चीनचा विरोध धुडकावून अमेरिकी संसद सदस्य तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले

अमेरिकी संसद सदस्यवॉशिंग्टन/तैपेई – तैवानच्या मुद्यावरून चीन अमेरिकेला वारंवार धमकावित असतानाही अमेरिका त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री अमेरिकेच्या पाच संसद सदस्यांचा समावेश असलेले उच्चस्तरिय शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले. शुक्रवारी या शिष्टमंडळाने तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेऊन व्यापक चर्चा केली. अमेरिका-तैवानमधील या वाढत्या सहकार्यावर इशारा देण्यासाठी चीनने आपली आठ लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत धाडल्याचे उघड झाले आहे.

गेल्या वर्षभरात चीनची सत्ताधारी राजवट तैवानच्या मुद्यावर अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात तैवानचे विलिनीकरण चीनमध्ये होणारच, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर चीनमध्ये लष्करी तसेच इतर पातळ्यांवरही हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ‘वॉर पॉवर्स’ देण्यात आल्याचेही वृत्त समोर आले होते. चीनच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेसह इतर मित्रदेशांनी तैवानबरोबरील सहकार्यावर अधिकाधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकी संसद सदस्यअमेरिकी संसद सदस्यांनी अवघ्या महिन्याभरात दुसर्‍यांदा तैवानला भेट देणे याला दुजोरा देणारी घटना ठरते. यापूर्वी ९ नोव्हेंबरला अमेरिकेचे सहा संसद सदस्य संरक्षणदलाच्या विमानातून तैवानमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी तसेच आर्थिक मुद्यांवर दुसरी चर्चा पार पडली होती. गुरुवारी रात्री अमेरिकेचे १७ सदस्यीय शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले आहे. त्यात पाच संसद सदस्यांचा समावेश आहे. मार्क टकानो, एलिसा स्लॉटकिन, कॉलिन ऑल्रेड, सारा जेकब्स व नॅन्सी मेस अशी या सदस्यांची नावे आहेत.

या सदस्यांसह आलेल्या अमेरिकी शिष्टमंडळाने तैवानमधील सरकारी तसेच लष्करी अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्याचवेळी अमेरिकी संसद सदस्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पुढील महिन्यात होणार्‍या ‘डेमोक्रसी समिट’साठी तैवानला आमंत्रण दिल्याचे जाहीर केले होते. या समिटमधून चीनला वगळण्यात आले आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता अमेरिकी संसद सदस्यांची भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिका-तैवानमधील या वाढत्या सहकार्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. तैवानला इशारा देण्यासाठी चीनने आपली आठ लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत धाडल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

leave a reply