इस्रायल व बाहरिनमध्ये संरक्षणविषयक करार संपन्न

संरक्षणविषयक करारमनामा – इस्रायलने बाहरीनसोबत संरक्षणविषयक करार केला आहे. दीड वर्षांपूर्वी इस्रायल आणि बाहरिन यांच्यात झालेल्या अब्राहम कराराचा हा पुढील टप्पा ठरतो. तर इराणच्या अणुकार्यक्रमामुळे आणि इराणसंलग्न हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या कराराकडे पाहिले जाते.

इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांत्ज यांनी दोन दिवसांपूर्वी बाहरिनला भेट दिली होती. या आपल्या भेटीतच इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बाहरिनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बाहरिनचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला बिन हसन अल नुएमी यांची भेट घेऊन हा करार केला. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमध्ये सराव, सहकार्य आणि गोपनीय माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे.

संरक्षणविषयक करारअब्राहम करारानंतर इस्रायलने अरब देशाबरोबर केलेला हा दुसरा संरक्षण करार ठरतो. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने मोरोक्कोबरोबर असाच करार केला होता. या करारासह इस्रायल आणि बाहरीन या दोघांनीही इराणला इशारा दिल्याचा दावा केला जातो. इस्रायलप्रमाणे बाहरिनने देखील इराणच्या अणुकराराला याआधी कडाडून विरोध केला होता. तर गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदी अरेबिया आणि यूएईवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले आहेत. या पार्श्वभूमीवरही इस्रायल आणि बाहरीन यांच्यातील या संरक्षण विषयक कराराकडे पाहिले जाते.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि अरब देशांमध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर सहकार्य प्रस्थापित होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी युएईचा दौरा केला होता. तर इस्रायल, सौदी अरेबिया आणि ओमान या देशांचे नौदल संयुक्त सरावात सहभागी झाले होते.

leave a reply