अमेरिका आखातातील प्रभाव गमावत चालली आहे

- आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा इशारा

वॉशिंग्टन – आत्तापर्यंत सौदी अरेबिया हा अमेरिकेचा आखातातील सहकारी देश म्हणून ओळखला जात होता. पण गेल्या आठवड्यात सौदीने ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’मध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. सौदीची ही घोषणा अमेरिकेसाठी सर्वात मोठा हादरा ठरतो. कारण ‘एससीओ’मधील सौदीच्या समावेशामुळे अमेरिका सौदीसह इतर अरब मित्रदेशांवरील आपला प्रभाव गमावत चालली आहे. इतकेच नाही तर चीन व रशिया या अमेरिकेच्या शत्रूदेशांचा या क्षेत्रातील प्रभाव वाढल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत.

अमेरिका आखातातील प्रभाव गमावत चालली आहे - आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा इशारासौदी अरेबिया ‘एससीओ’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. सौदीने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण गेल्या आठवड्यात अचानक सौदीने ‘एससीओ’चा ‘डायलॉग पार्टनर’ होणार असल्याची घोषणा केली. सौदीच्या या घोषणेचे आखातातील इतर अरब मित्रदेशांनी स्वागत केले होते. सौदीप्रमाणे युएई, कुवैत, बाहरिन देखील एससीओमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जाते.

चीन व रशियाने संघटीत केलेली ‘एससीओ’ ही जगातील सर्वात मोठी क्षेत्रीय राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना असल्याचा दावा केला जातो. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येचा विचार केला तरी ही संघटना जगातील इतर प्रादेशिक संघटनांपेक्षा मोठी ठरते. यामध्ये चीन, रशियाबरोबरच भारत, कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. इराण, बेलारूस निरिक्षक देश तर तुर्की, अझरबैजान, आर्मेनियासह असियान सदस्य देश देखील या संघटनेशी जोडलेले आहेत.

अमेरिका आखातातील प्रभाव गमावत चालली आहे - आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा इशाराअशा या संघटनेतील सौदीचा समावेश अमेरिकेसाठी गंभीर बाब असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक बजावत आहेत. याबरोबर अमेरिकेने आखातातील आपला प्रभाव गमावल्याचा इशारा सायमन वॅटकिन्स यांनी दिला आहे. एससीओबरोबर जुळवून घेण्यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे नाकारता येत नाही. पण चीन-रशियाच्या गटात सामील होण्यासाठी सौदीला प्रवृत्त करण्यामध्ये बायडेन प्रशासनाची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचेही लक्षात घ्यायला हवे, असे वॅटकिन्स यांनी म्हटले आहे.

फक्त आखातातील नाही तर जगभरातील अमेरिकेचा प्रभाव ओसरत चालला आहे. अमेरिकेकडे जागतिक नेतृत्व म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे, याकडे अमेरिकेतील आणख्या एका विश्लेषकाने लक्ष वेधले. बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांचा फायदा चीन घेत असल्याचा दावा अमेरिकी विश्लेषक करीत आहेत.

leave a reply