अमेरिकी फौजा व आशियातील मित्रदेश लढाईसाठी सज्ज आहेत

- अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा चीनला इशारा

वॉशिंग्टन/टोकिओ – गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धिंगत होणारे संरक्षण सहकार्य व लष्करी सराव यांच्या माध्यमातून अमेरिकी फौजा आणि अमेरिकेचे आशियातील मित्रदेश लढाईसाठी सज्ज झाले आहेत, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल जोसेफ रायन यांनी दिला. आशियात नाटोप्रमाणे लष्करी आघाडी नसली तरी विविध करार व सामरिक भागीदारींमुळे क्षेत्रिय सुरक्षा आघाडी तयार झाली आहे, असा दावाही रायन यांनी केला. रायन यांचे हे वक्तव्य चीन व उत्तर कोरियाकडून पॅसिफिक क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना दिलेला इशारा असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी आपल्या वक्तव्यात जपान, फिलिपाईन्स व ऑस्ट्रेलिया या देशांचा उल्लेख केला आहे. रायन इशारा देत असतानाच जपान व फिलिपाईन्समध्ये व्यापक संरक्षणकरार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन तसेच उत्तर कोरियाच्या कारवाया अधिकाधिक आक्रमक होत असून पुढील युद्ध या पॅसिफिक क्षेत्रात होईल, असे इशारे सातत्याने देण्यात येत आहे. चीनकडून सातत्याने तैवानला हल्ल्यांच्या धमक्या देण्यात येत आहेत. तर उत्तर कोरियाकडून आण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांसह नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. जपान व दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वारंवार या क्षेत्रातील सुरक्षेचा मुद्दा मांडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने युद्धसज्जतेबाबत व्यक्त केलेला विश्वास लक्ष वेधून घेणारा ठरतो.

मेजर जनरल रायन हे हवाई बेटांवरील अमेरिकी लष्कराच्या 25 इन्फंट्री डिव्हिजनचे प्रमुख कमांडर आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिका व फिलिपाईन्समध्ये झालेल्या संरक्षणकरारासाठी त्यांनी फिलिपाईन्सला भेट दिली होती. या भेटीनंतर बोलताना त्यांनी चीन व उत्तर कोरियाचा धोका आणि त्याविरोधात अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली तयार होणारी आघाडी याबाबत आपली भूमिका मांडली. ‘आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील काही देश जागतिक व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याविरोधात फिलिपाईन्स, जपान, ऑस्ट्रेलियासह यासारख्या अमेरिकच्या सहकारी देशांनी चांगली इच्छाशक्ती दाखवून आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आक्रमक कारवाया करणाऱ्या देशांविरोधात गप्प बसणार नाही, असा स्पष्ट संदेश अमेरिकेच्या मित्रदेशांनी दिला आहे’, याकडे मेजर जनरल रायन यांनी लक्ष वेधले.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेचे मित्रदेश व भागीदारांनी चीन तसेच उत्तर कोरियाच्या चिथावण्यांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. या देशांनी स्वीकारलेले धोरण आश्चर्याचा धक्का देणारे आहे, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धात रशियाला बसलेल्या धक्क्यांमुळे चीन व उत्तर कोरियासारख्या देशांना योग्य इशारा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी हा इशारा देत असतानाच जपान व फिलिपाईन्समध्ये महत्त्वपूर्ण संरक्षणकरारावर एकमत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या करारानुसार दोन्ही देशांची संरक्षणदले परस्परांच्या तळांचा वापर करु शकणार आहेत. चीनच्या विस्तारवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची ठरते, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.

चीनकडून तैवान व इतर देशांना असणाऱ्या धोक्याविरोधात अमेरिकेने विविध स्तरांवर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त संरक्षणसराव त्याचाच एक भाग मानला जातो. अमेरिकेचे मित्रदेश असलेल्या ब्रिटन व ऑस्ट्रेलियाचा नेवाडा प्रांतात व्यापक हवाईसराव सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. ‘रेड फ्लॅग’ असे या सरावाचे नाव असून त्यात अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाची लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. या सरावापाठोपाठ पुढील आठवड्यात जपान व अमेरिकेमध्ये ‘आयर्न फिस्ट’ या ॲम्फिबियस सरावाला सुरुवात होणार आहे.

leave a reply