हिंसक निदर्शकांना रोखण्यासाठी अमेरिकेत लष्कराची तैनाती

वॉशिंग्टन – अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले असून प्रमुख शहरांमधील परिस्थिती चिघळल्याचे समोर आले आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये लष्कर तैनात करावे लागले असून २० हून अधिक राज्यांमध्ये नॅशनल गार्डची पथके धाडण्यात आली आहेत. देशभरात सुरू असलेली निदर्शने आणि त्यातील हिंसाचारामागे अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस व समर्थक गटांचा कट असल्याचे आरोप अमेरिकेतील कलाकार तसेच विश्लेषकांकडून सुरू झाले आहेत. हे आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला दुजोरा देत असून त्यांच्या धोरणांना विरोध करणारे गट सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत.

America demonstrationsगेल्या आठवड्यात सोमवारी २५ मे रोजी, अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एका पोलिसी कारवाईत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजात संतापाची लाट उसळली असून पोलिसी अत्याचारांच्या निषेधार्थ व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. फ्लॉईड यांच्या मृत्यूचे निमित्त पुढे करून देशभरात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून त्याचा फायदा काही राजकीय गट व चळवळी भेट असल्याचे समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे आंदोलन व त्यात भडकलेल्या हिंसेमागे अराजकाचा व्यापार करणारे गट असल्याचा आरोपही केला होता.

आता अमेरिकेतील राजकीय विश्लेषक व कलाकारही ट्रम्प यांच्या विरोधकांकडून आंदोलनाची सूत्रे हलविण्यात येत असल्याचे दावे करू लागले आहेत. अमेरिकेतील ज्येष्ठ व प्रसिद्ध अभिनेते जेम्स वुड्स आणि विश्लेषक नायजर इनिस यांनी देशभरात पसरविण्यात आलेल्या ट्रम्प विरोधी निदर्शनांमागे अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांचा हात असल्याचे म्हटले आहे.

Americaजेम्स वुड्स यांनी, सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये, आपली समस्या कृष्णवर्णीय विरुद्ध गौरवर्णीय ही नसून जॉर्ज सोरोस विरुद्ध अमेरिका ही असल्याचा उघड आरोप केला. तर, सोरोस अमेरिकेसाठी गंभीर धोका असून ते अमेरिकी समाज उद्ध्वस्त करायला निघाले आहेत; त्यांची काही दशकांपूर्वीच अमेरिकेतून हाकालपट्टी करायला हवी होती, असे नायजर इनिस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होण्यापूर्वी युरोपमधील हंगेरीत जन्मलेले जॉर्ज सोरोस ज्यूवंशीय असून १९९२ साली घडलेल्या बँक ऑफ इंग्लंड गैरव्यवहार प्रकरणातून प्रसिद्धीच्या झोतात आले.पूर्व युरोपमधील कम्युनिस्ट राजवटी उलथण्यामागे सोरोस यांचा हात असल्याचे मानले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये आपला विस्तार केला असून काही देशांमध्ये झालेल्या राजकीय आंदोलनांमध्ये ही संस्था सूत्रधार असल्याचे आरोप झाले आहेत. सोरोस यांची जन्मभूमी असलेल्या हंगेरीमध्ये तर त्यांच्या कारवायांना रोखण्यासाठी ‘अँटी सोरोस’ कायदाही करण्यात आला आहे.

ट्रम्प यांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखण्यात येणारे सोरोस अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाचे खंदे समर्थक आहेत. पक्षाशी संबधित असलेल्या अनेक गटांना सोरोस व त्यांच्या संस्थेकडून मोठ्या प्रमाणावर निधी पुरविण्यात आल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. अनेक डेमोक्रॅट नेत्यांनी सोरोस यांच्या भेटीगाठी घेतल्याचे तसेच त्यांच्या कार्याचे समर्थन केल्याची माहितीही समोर आली होती. त्यामुळे अमेरिकेत सध्या सुरू असणारे आंदोलन, त्यातील हिंसाचार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर होणारी टीका आणि ट्रम्प व इतरांकडून होणारे आरोप यातुन अमेरिकेतील राजकीय दुफळी प्रकर्षाने दिसून येते.

USA Militaryया पार्श्वभूमीवर, सोरोस यांच्यावर अमेरिकेतून होणारे आरोप व देशातील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण लक्ष वेधून घेणारे ठरते. गेले आठ दिवस अमेरिकेतील अनेक प्रमुख राज्यांमध्ये व शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. आंदोलनातील हिंसाचाराची तीव्रता वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली होती.

मात्र आता निदर्शकांनी संचारबंदीचे उल्लंघन करून पोलिसांवर हल्ले तसेच मालमत्तेची नासधूस सुरू केली आहे. राजधानी वॉशिंग्टनसह न्यूयॉर्क, लॉस एंजलिस अटलांटा, फिलाडेल्फिया, ह्युस्टन, सिएटल या शहरांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्कमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी एड मुलीन्स यांनी, शहरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगून लष्कर तैनात करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी लष्कराचे दीड हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. राजधानीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्सही गस्त घालत आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या तैनातीची माहिती दिली असून आवश्यकता भासल्यास इतर भागांमधील तैनातीसाठीही लष्कर तयार असल्याचे संकेत दिले आहेत. वॉशिंग्टनमधील लष्करी तैनाती व्यतिरिक्त अमेरिकेतील २०हून अधिक राज्यांमध्ये लष्कराचा ‘रिझर्व्ह फोर्स’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या नॅशनल गार्डचे जवान तैनात आहेत.

leave a reply