पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याच्या आरोपाला दुजोरा मिळाला – भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचा टोला

नवी दिल्ली – अफगाणिस्तानात सुमारे साडेसहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत. यापैकी हजार जण ‘जैश-ए- मोहम्मद’ आणि ‘लश्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीसमोर आला आहे. या अहवालामुळे भारत पाकिस्तानवर करीत असलेले आरोप सिद्ध झाले असून पाकिस्तान अजूनही जागतिक दहशतवादाचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने केला आहे. सुरक्षा परिषदेत समोर आलेल्या अहवालात अफगाणिस्तानात सुमारे साडेसहा हजार दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगून ‘लश्कर-ए-तोयबा’ व ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी तालिबानने हात मिळवणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा दाखला देऊन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर सडकून टीका केली. या अहवालामुळे भारत करीत असलेल्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले. दहशतवाद्यांवरील कारवाईबाबत आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडण्यात पाकिस्तान पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे, असा टोला श्रीवास्तव यांनी लगावला.

India, Pakistan, terrorism

‘एफएटीएफ’ अर्थात ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’ समोर पाकिस्तानने आपण दहशतवाद्यांवर कारवाई करीत असल्याचे सांगून एफएटीएफ ग्रे लिस्ट मधून आपले नाव काढून टाकावे ,असे आवाहन पाकिस्तानने केले होते. मात्र पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करणे दूरच राहिले उलट दहशतवादी संघटनांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहे, हे या अहवालामुळे स्पष्ट झाल्याचे भारताने लक्षात आणून दिले आहे.

पाकिस्तानात अजूनही दहशतवादी मोकाट वावरत असून या देशात दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांची भरती व प्रशिक्षण सुरू असून येथे त्यांना शस्त्रास्त्रे व पैसा पुरविला जातो व पूर्णपणे संरक्षण केले जाते, असा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला. म्हणूनच पाकिस्तानातून उदयाला येत असलेल्या या दहशतवाद्यांपासून शेजारी देशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे संकेत देऊन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानात दहशतवादी पाठवून या देशाची सुरक्षा धोक्यात टाकत असताना भारत मात्र अफगाणिस्तानच्या स्थैर्य व विकासासाठी योगदान देत राहील, अशी ग्वाही अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे.

leave a reply